माहिती अधिकारातील तरबेज सुभेदार…

 
माहिती अधिकारातील तरबेज सुभेदार…
महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहराची लोकसंख्या १ लाख २० असून एक सुधारित खेडे म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. सतत पडणारा दुष्काळ, दळणवळणाचा अभाव यामुळे उस्मानाबादचा विकास खुंटला आहे. केवळ सरकारी कार्यालय आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शहराची आर्थिक उलाढाल सुरु आहे. त्यामुळे उस्मानाबादेत सरकारी सुट्टीच्या दिवशी अघोषित संचारबंदी असते.
 
उस्मानाबादच्या एकंदरीत अवस्थेकडे पाहून कोणताही महसूल आणि पोलीस दलाचा मोठा अधिकारी आणि कर्मचारी उस्मानाबाद नको म्हणून सांगतो. इतकेच काय तर उस्मानाबादला येण्यास धजावत नाहीत पण येथे नाइलाजास्तव आल्यानंतर खाबुगिरीची चटक लागल्यानंतर लवकर हालत नाहीत, उलट उस्मानाबाद पाहिजे म्हणून आग्रह धरतात. काही अधिकारी उस्मानाबादेत येवून बरीच माया जमवून गेल्याच्या  रसभरीत कहाण्या  आहेत. माहितीचा अधिकार येण्यापूर्वी सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार झाकला जात होता. मात्र माहितीचा अधिकार आल्यापासून तो चव्हाट्यावर येवू लागला आहे.

सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार लोकांना नवा नाही. मात्र माहितीच्या अधिकारात माहिती काढून, त्याचा पाठपुरावा करून अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई, त्यांना दंड  तसेच सरपंचापासून अनेक पदाधिकाऱ्यांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याचे कुणी काम करत असेल तर सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार ! एखाद्या शासकीय कार्यालयात सुभेदार यांचा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज  आला की शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरते. कारण सुभेदार यांनी एखाद्या  प्रकरणात हात घातला की, शेवटपर्यंत सोडत नाहीत.
 
माहितीच्या अधिकारात एखाद्या प्रकरणात माहिती मिळाली नाही की सुभेदार वरिष्ठांकडे अपील करतात, तेथेही माहिती मिळाली नाही  की राज्य माहिती आयोगाकडे दाद मागतात. तेथे वकील न लावता  स्वतःची बाजू स्वतः मांडतात. माहितीच्या अधिकारातील सर्व कलमे, उपकलमे याचा तोंडपाठ अभ्यास बाळासाहेब सुभेदार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे. सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरटीओ  आदी अधिकाऱ्यांचाही कथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार काढून तो चव्हाट्यावर मांडला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई तसेच दंड करण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे.
 
सुभेदार यांचे मूळ गाव उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर. मात्र सन २०१२ पासून उस्मानाबादेत जाधववाडी रोडलगत असलेल्या छत्रपती संभाजीराजे कॉलनी मध्ये  राहत आहेत.त्यापूर्वी ते शिक्षक कॉलनी मध्ये भाड्याने राहत होते. सध्या त्यांचे वय ३२ असले तरी अनेकांची बत्तीशी काढण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे. सुरुवातीला कपड्यांच्या दुकानात सेल्समन तसेच वृत्तपत्र एजंट म्हणून काम करता करता त्यांना वृत्तपत्र वाचण्याचे वेड लागले. त्यातून संघर्ष करण्याची उर्मी प्राप्त झाली. जाधववाडी रोडवर सुभेदार यांना  त्यांच्या  मामांनी सन २००७ मध्ये एक प्लॉट घेऊन दिला आहे. त्यामध्ये सन २०१२ मध्ये  मामांनीच  त्यांना राहण्यासाठी शेड मारुन दिले परंतु त्यामध्ये महावितरण कंपनीचे भ्रष्ट अधिकारी विज कनेक्शन देत नव्हते. अनेक हेलपाटे घालूनही महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार अर्जातून  वीज कनेक्शन का देत नाहीत याची माहिती मागितली. त्यातून वरिष्ठाकडे तक्रार केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई झाली परंतु ती सुभेदार यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर न्यायालयातून गुन्हे दाखल केले. स्वतःवर झालेल्या अन्यायातून दुसऱ्याचा अन्याय दूर करण्याची त्यांना  एक प्रेरणा मिळाली. त्याला जोड मिळाली, माहितीचा अधिकार !

सुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही असे कधी घडले नाही. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षात किमान २०० ते ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली आहे. मोठमोठ्या  अधिकाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना  त्रास देण्याचा उद्योग काही भ्रष्ट बड्या अधिकाऱ्यांकडून तर काही गावगुंड प्रवृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांकडून झाला मात्र त्याला न डगमगता त्यांनी मोठ्या धाडसाने तोंड दिले. कुणी निंदा अथवा वंदा , माहितीच्या अधिकारात माहिती काढून अधिकाऱ्याना दंड करणे हाच माझा धंदा असे सुभेदार यांचे अलौकिक कार्य आहे.
 
सुभेदार यांच्यामुळे खालील अधिकाऱ्यावर  कारवाई झाली.
  • कनिष्ठ लेखाधिकारी पदभरती घोटाळा प्रकरणी दोषारोप दाखल करण्याचे विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांचे आदेश . प्रकरणात डॉ.प्रशांत भोलानाथ नारनवरे (तत्कालीन जिल्हाधिकारी,उस्मानाबाद) सुमन मदणसिंग रावत (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद ) शिरीष दत्तात्रय बनसोडे (तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद )व इतर यांची लवकरच विभागीय चौकशी प्रस्तावित होणार …
  • शिल्पा नरसिंह करमरकर (तत्कालीन उप जिल्हाधिकारी (भूसंपादन),मध्यम प्रकल्प क्र.२,उस्मानाबाद ) – यांच्या विरुध्द विभागीय चोकशी प्रस्तावित करणे कामी दोषारोप दाखल
  • मोतीचंद राठोड ( उप विभागीय पोलीस अधिकारी,उस्मानाबाद ) – यांचे विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग,खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश
  • सोनाली तुळशीराम साळुखे (तत्कालीन कारकुन,तहसिल कार्यालय,उस्मानाबाद)- यांचा माहे सप्टेंबर २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद
  • सुनिता रामचंद्र पाटील (तत्कालीन तलाठी,इर्ला ) – यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद
  • बाजीराव पाटील प्राथमिक शाळा,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी शासनाकडे केली शिफारस
  • न्यु किड्स किगड्म इंग्लिश स्कुल,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक ),जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे पाठविला प्रस्ताव
  • एस.यु.वाकुरे (तत्कालीन कार्यकारी अभियंता,सर्व शिक्षा अभियान,जिल्हा परिषद,उस्मानाबाद )- यांनी केलेला शासकीय रक्कमेचा अपहार रक्कम रुपये-१८२६५/- त्यांच्याकडून वसूल करण्यात आले
  • एन.ए.जोशी (सेवानिवृत लिपीक,नगर परिषद,उस्मानाबाद)- यांच्या दोन वेतन वाढी रोकण्यात आल्या… 
  • दिप्ती दिवाकर कुलकर्णी ( तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय,दाऊतपूर )- यांची एक वार्षिक वेतन वाढ थोपवण्यांत आली
  • भास्कर कोल्हे (वरिष्ठ सहाय्यक)  व तानाजी जाधव (परिचर,बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद ) तसेच पी.आर.बेंद्रे (वरिष्ठ सहाय्यक, बांधकाम),जिल्हा परिषद,उपविभाग,कळंब- यांना ठपका ही शिक्षा देण्यात आलेली आहे
  • मालन दिलीप सोलनकर ( तत्कालीन सरपंच) दिप्ती दिवाकर कुलकर्णी (तत्कालीन ग्रामसेवक) गणेश नामदेव देशमुख (तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय,दाऊतपूर)  व भागवत रामभाऊ ढवळशंख (तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी) पंचायत समिती,उस्मानाबाद- यांचे विरुध्द पो.स्टे.ढोकी येथे भा.द.वि.कलम-४०९,४२०,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल
  • वसंत जनार्धन थेटे (सेवानिवृत्त उप अवेक्षक ) यशवंत भिमराव डांगे ( तत्कालीन मुख्याधिकारी) प्रेमनाथ दगडोबा दळवी (सेवानिवृत्त लेखापाल) अजय राजाराम चारठाणकर (तत्कालीन मुख्याधिकारी) सर्व नगर परिषद,उस्मानाबाद व उदय सदाशिव कुरवलकर (तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी,नगर विकास शाखा,उस्मानाबाद ) तसेच डी.व्ही.बारबोले (ठाणे अंमलदार,पो.स्टे.उस्मानाबाद (शहर) यांचे विरुध्द पो.स्टे.उस्मानाबाद (शहर),येथे भा.द.वि.कलम-४२०,४०९,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल
  • रावसाहेब विठ्ठल चकोर ( तत्कालीन गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद ) यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, खंडपीठ यांचे आदेश

From around the web