धाराशिव लाइव्हचा दणका : नायब तहसीलदार केलूरकरवर 'ठपका' ...
धाराशिवच्या सर्कीट हाऊसमध्ये वर्षभरापूर्वी 'ओली पार्टी' करणे भोवले !
धाराशिव - धाराशिवच्या सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदारांसोबत ओली पार्टी केली होती, याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशीअंती केलूरकर यांच्यावर 'ठपका' ठेवला असून, तशी नोंद मूळ सेवा पुस्तिकेत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केलूरकर यांची काळ्या यादीत नोंद झाली आहे.
धाराशिव लाइव्हने उघडकीस आणलेल्या या प्रकरणाची माहिती अशी की, धाराशिवच्या सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केली होती. एकीकडे उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात गेले तीन महिने गहू , तांदूळ आणि साखर याचे वाटप नाही तर दुसरीकडे हे धान्य काळ्या बाजारात विकून आलेल्या पैश्यातून ओली पार्टी तेही चक्क सर्कीट हाऊसमध्ये केली जात होती.
बुधवार दि. ८ जून २०२२ रोजी रात्री 6 ते 12 पर्यंत ही ओली पार्टी सुरू होती, मटनावर ताव आणि प्यायला दारू यामुळे ही पार्टी चांगलीच रंगली होती,नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर आणि शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता पोहच करीत असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही, या गुर्मीत हा धिंगाणा सुरू होता.
उस्मानाबाद लाइव्हने याबाबत सर्वप्रथम वृत्त दिले होते. या वृत्ताची तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गंभीर दखल घेऊन नायब तहसीलदार ( पुरवठा ) केलूरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. केलुरकर यांनी आपण पार्टी केली पण ती ओली नव्हती असा खुलासा करून माफी मागितली होती.
त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशी अंती केलूरकर यांच्यावर ठपका ठेवला असून, तशी नोंद मूळ सेवा पुस्तिकेत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केलूरकर यांची काळ्या यादीत नोंद झाली आहे. याप्रकरणी केलुरकर यांची उमरगा येथे निवडणूक विभागात बदली झाली आहे.
याप्रकरणी नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असला तरी पार्टीसाठी सर्कीट हाऊस उपलब्ध करून देणाऱ्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याच त्या बातम्या
उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये तहसीलच्या बड्या अधिकाऱ्याची ओली पार्टी रंगली !
ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांना कारणे दाखवा नोटीस
उस्मानाबाद लाइव्हचा दणका ! सर्किट हाऊसमध्ये झालेल्या ओली पार्टी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांच्यावर ठपका