गुन्हा दाखल झाला ! आता आरोपी अटक कधी होणार ?

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने ऑनलाईन बाजार मांडणाऱ्या पाच बोगस वेबसाईटविरुद्ध अखेर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, आता याप्रकरणी आरोपीना कधी अटक होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान आरोपींची नावे मंदिर समितीच्या तहसीलदारांना माहित असताना, त्यांनी एफआयआरमध्ये त्यांची नावे का दिली नाहीत ? असा सवाल तक्रारकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी विचारला आहे. आम्हाला या वेबसाइट चालकांची नावे माहित असून, लवकरच ती जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.
श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर गेले दीड वर्षे बंद असताना आणि सर्व पूजा विधी बंद असताना, ऑनलाईन वेबसाइट काढून काही पुजाऱ्यांनी गोरखधंदा सुरु केला होता. पूजा विधीच्या नावाखाली भक्ताकडून ऑनलाईन देणग्या उकळल्या जात होत्या, त्याचा भांडाफोड सर्वप्रथम उस्मानाबाद लाइव्हने केला आहे.
याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये https://www.tuljabhavani.in/ या वेबसाइटसह २ https://tuljabhavanipujari.com / ३ https://www.tuljabhavanimandir.org/ ४. https://shrituljabhavani.com/ ५. https://epuja.co.in/ या पाच वेबसाईटवर भादंवि ४२०, सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम , २००८ चे कलम ६६ c , ६६ d नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिर समितीचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद देताना आरोपींची नावे माहित असताना जाणीवपूर्वक नावे देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे मंदिर समितीचे काही अधिकारी यात गुंतले आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यास आरोपींची नावे जाहीर करून भांडाफोड करणार - सुभेदार
या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.
वेबसाइट चालवणारे सर्व बडे मासे आहेत, त्यात मंदिर समितीचे काही अधिकारी, कर्मचारी सुद्धा गुंतले आहेत. या वेबसाइट सुरु होऊन दोन वर्षे होत आले तरी मंदिर समितीच्या लक्षात ही बाब का आली नाही ? असा सवालही सुभेदार यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनी कोणालाही पाठीशी न घालता वेबसाइट चालक तसेच वेबसाइट डेल्व्हलपर यांना अटक करावी. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यास आरोपींची नावे जाहीर करून भांडाफोड करणार असल्याचेही सुभेदार यांनी शेवटी सांगितले.
यापूर्वीच्या बातम्या
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक
भाविकांची फसवणूक करणाऱ्या पाच बोगस वेबसाइटवर अखेर गुन्हा दाखल