श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे चौकशीचे आदेश 
 
s
पुजाऱ्यांच्या संगनमताने मंदिर संस्थानचे बडे अधिकारी गुंतल्याची शक्यता 

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी  मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात काही पुजारी, मंदिर संस्थानचे बडे अधिकारी  गुंतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे.  मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे. या वेबसाइटवर पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण -नारळ ओटी पूजा , जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. 

s

त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात. मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे.  या वेबसाइटवर कुणाचाही नंबर नाही. मात्र गुप्त माहितीनुसार ही वेबसाइट चालवणाऱ्याचा नंबर आम्हाला मिळाला आहे. तो सोबत जोडला आहे. 

s

वेबसाइट काढण्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच आजपर्यंत किती रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला , या आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत,अशी मागणीही  सुभेदार यांनी केली आहे.

s

सुभेदार यांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी , उस्मानाबाद यांना याप्रकरणी तात्काळ नियमानुसार कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईबाबत अर्जदारास परस्पर अवगत करावे, असे आदेशात म्हटले आहे.


एक नव्हे चार वेबसाईट 

तुळजाभवानीच्या नावे एक नव्हे तर चार बोगस वेबसाईट सुरु असून , सायंकाळपर्यंत सर्व अहवाल सायबर पोलिसांकडे देण्यात येईल, असे मंदिर समितीचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना सांगितले. 

From around the web