उस्मानाबादच्या निविदा प्रकरणी मलिदा कुणाला ? 

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षाविरुद्ध दंड थोपटले !  भाजपची भूमिका गोलमाल ...  
 
उस्मानाबादच्या निविदा प्रकरणी मलिदा कुणाला ?

उस्मानाबाद नगर पालिकेची  निवडणूक नोव्हेंबर २१ मध्ये होणार आहे. त्याअगोदरच राजकीय धुळवड सुरु  झाली आहे. प्रशासनाची मान्यता नसताना जवळपास ४० कोटीची ५४ कामे सुरु करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, त्याला शिवसेनेचे नगरसेवक सूरज साळुंके आणि उदय निंबाळकर यांनी हरकत घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. त्याची दाखल घेत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी, निविदा रद्द करण्याचे मुख्याधिकाऱ्याना निर्देश दिले, त्यानंतर मुख्याधिकाऱ्यानी साहेबांचा आदेश मानत निविदा प्रक्रिया रद्द केली. 

निविदा रद्द होताच, शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपला संताप व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांची मोगलाई सुरु असल्याचा थेट आरोप केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमाकडे लेखी उत्तर पाठवले. ते माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर 'दूध का दूध' आणि 'पाणी का पाणी' झाले. नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्यात वाद पेटत चाललेला असताना,  पालिकेत विरोधी पक्ष असलेला भाजप मात्र थंड आहे.भाजपच्या कोणत्याही नगरसेवकाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

गेली चार वर्षे शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक पालिकेत एकत्र नांदत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर नुकत्याच झालेल्या सभापती निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी झाली तर भाजप हा शिवसेनेपासून दुरावला. त्यात राष्ट्रवादीतील आ. राणा पाटील समर्थक भाजपबरोबर गेले. उस्मानाबाद नगर पालिकेत एकूण ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. पैकी राष्ट्रवादीचे माणिक बनसोडे यांचे निधन झाल्याने संख्याबळ ३८ झाले आहे.  त्यात  शिवसेनेचे - ११ , भाजपचे - १५  ( मूळ भाजपचे ८  आणि आ. राणा पाटील समर्थक ७ ) , राष्ट्रवादी - ९ , काँग्रेस - २ , अपक्ष - १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे शिवसेनेचे असून थेट जनतेतून निवडून आले आहेत. 

एकीकडे  शिवसेनेचे दोन नगरसेवक निविदा प्रकरणी शिवसेनेच्या नगराध्यक्षा विरुद्ध दंड थोपटले असताना, भाजपचे सर्व नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत.  निविदा रद्द झाल्याप्रकरणी कुणीही समर्थनार्थ किंवा विरोधात प्रतिक्रिया दिलेली  नाही.  गटनेते राहिलेले आणि आ. राणा पाटील समर्थक नगरसेवक युवराज नळे यांनी लिहिलेल्या  "कोरोना डेज" या पुस्तक प्रकाशनाला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे आवर्जून उपस्थित होते. तसेच 'साल नया, गीत पुराणे ' या मेलडी मध्ये नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी १९६५ मधील 'वक्त' चित्रपटातील 'ए मेरी जोहरा ज़बीं' हे गीत गाऊन 'वक्त - वक्त की  बात है' हे दर्शवून दिले.

सुरुवातीच्या काळात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध रान उठवणारे युवराज नळे यांचे आता नगराध्यक्षांबरोबर सूर जुळले आहेत. बाकी भाजपचे नगरसेवक अजूनही जुन्या मानसिकेतून बाहेर आलेले नाहीत. नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत. आगामी काळात बऱ्याच उलथापालथी होणार आहेत.पण भाजपची गोलमाल भुमीका आगामी निवडणुकीत त्यांना मारक ठरणार हे नक्की ! दुसरीकडे उस्मानाबादच्या निविदा प्रकरणी मलिदा कुणाकुणाला मिळाला होता, याची जोरदार चर्चा सुरु आहे. 


- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 


संबंधित  बातम्या 

उस्मानाबाद नगराध्यक्षांच्या आरोपाला जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर

शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना दणका

  

From around the web