खा. ओमराजे आणि आ. राणा पाटील यांच्यात पुन्हा शाब्दिक खडाजंगी
धाराशिव : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. सहा महिन्यापूर्वी या दोघांत चांगलीच हमरी- तुमरी झाली होती. त्याची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा एकदा दोघात वादाची ठिणगी पेटली आहे.
शाब्दिक खडाजंगीनंतर खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. राणा पाटील पुन्हा एकत्र आले पण राज शिष्टाचार विसरले !
धाराशिवमध्ये सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. घारगाव (ता. कळंब) येथील जलजीवन मिशनच्या कामाचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. यावर एका अधिकाऱ्याने तांत्रिक मुद्द्याचे कारण पुढे केले. त्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यास जाब विचारला. त्यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हळू आवाजात बोलण्याचा सल्ला ओमराजेंना दिला.
यावरूनही दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर तेरणा प्रकल्पाच्या बंद पाइपलाइनचा विषय निघाला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये हुमरातुमरी झाली. 'औकातीत राहा, बाळ आहेस तू, ट्रस्टचा लुटारू, भंगारचोर' अशा शब्दांत एकमेकांचा उद्धार करण्यात आला. दोघेही एकमेकांना एकेरीवर येऊन बोलत होते.
राणा पाटील यांनी ओमराजेला 'भंगारचोर' म्हटले तर ओमराजे यांनी तेरणा ट्रस्टची चोरी तू आणि तुझ्या बापाने केली ,जास्त बोलू नको, तुझ्या औकातीत राहा असा शब्दप्रयोग केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी सभागृहही अवाक् झाले.
ओमराजे यांचे वडील पवनराजे पवनराजे निंबाळकर यांची हत्या 3 जून 2006 रोजी कळंबोली, नवी मुंबई येथे भरदुपारी झाली होती. या प्रकरणी CBI ने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती. सध्या पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहेत, तेव्हापासून ओमराजे आणि राणा पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य आहे.