दाऊतपूरच्या सरपंच अपात्र प्रकरणी अवर सचिव नीला रानडे यांचा अर्थपूर्ण व्यवहार उघडकीस 

ग्रामविकास मंत्र्याची ऑर्डर नसताना परस्पर स्थगिती आदेश पाठवला 
 
s

मुंबई - दाऊतपूरचे सरपंच  बंकट बलभीम शिंदे यांना  छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) चे अप्पर विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरवले होते. त्याविरुद्ध शिंदे यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे अपील दाखल केले होते. अप्पर विभागीय आयुक्त यांच्या निर्णयास ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिलेली नसताना, अवर सचिव नीला  सुरेश रानडे यांनी अप्पर विभागीय आयुक्त  छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )  आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी ( धाराशिव ) यांना  परस्पर स्थगितीचे पत्र पाठवले आहे.

त्यानंतर सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, ही  धक्कादायक बाब उघड झाली आहे.  ग्रामविकास मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) चे अप्पर विभागीय आयुक्त यांच्या निर्णयास स्थगिती दिलेली नसताना किंवा तशी ऑर्डर केली नसताना अवर सचिव नीला  सुरेश रानडे यांनी दाऊतपूरचे सरपंच  बंकट बलभीम शिंदे यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून, बोगस स्थगिती पत्र पाठवल्याचे सिद्ध झाले आहे. 

अवर सचिव नीला  सुरेश रानडे यांच्या भ्रष्ट कारभाराची उच्चस्तरीय  चौकशी करून, चौकशीअंती कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवांकडे केली आहे. 

काय आहे प्रकरण  ? 

उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील ग्रामपंचायत सदस्य पल्लवी प्रशांत थोरात यांचे पती प्रशांत वसंत थोरात तसेच दीर समाधान वसंत थोरात यांनी गावठाण जागेवर अतिक्रमण केले होते. तसेच आणखी एक ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मारुती बनसोडे आणि त्यांचे चुलत भाऊ सचिन लक्ष्मण बनसोडे यांनी देखील गावठाण जागेवर अतिक्रमण केले होते, त्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ग्रामसेवक आणि सरपंचाकडे केली असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. 

गावातील अतिक्रमण काढले नाही म्हणून दाऊतपूरचे सरपंच बंकट शिंदे अपात्र

त्यानंतर सुभेदार यांनी उस्मानाबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता, ग्रामसेवकाची एक वेतनवाढ रोखण्यात आली. तसेच याप्रकरणी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओकडे अहवाल सादर केला असता, सीईओने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्याने, ग्रामपंचायत  सदस्य पल्लवी प्रशांत थोरात आणि प्रवीण मारुती बनसोडे या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते , तसेच सीईओने सरपंच बंकट बलभीम शिंदे यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून औरंगाबादचे अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला होता. त्याची सुनावणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर झाली असता अतिक्रमण न काढता कर्तव्यात कसूर केली म्हणून सरपंच बंकट बलभीम शिंदे यांना अपात्र ठरवले होते.

From around the web