शिवसेनेच्या निवेदनाला पोलिसांची केराची टोपली ...
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे यांनी दिला होता. मात्र शिवसेनेच्या निवेदनाला पोलिसांनी चक्क केराची टोपली दाखवली आहे.
उस्मानाबाद शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी २५ जून रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन, शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती.
अवैध धंदे बंद करण्याची शिवसेनेची मागणी
उस्मानाबाद शहरात मटका आणि ऑनलाईन जुगार तेजीत सुरु असून, अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू देखील विक्री केली जात आहे. त्यामुळे गोरगरीबांचे संसार उद्धवस्त होत आहेत. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे यांनी दिला होता. शिवसेनेने निवेदन देऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतेही कारवाई केली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दररोज १० लाखाची उलाढाल
उस्मानाबाद शहरात "आप्पा" नावाचा मटक्याचा मुख्य बुकी चालक आहे. त्याच्या अंडर शहरात मटका घेणारे ५० ते ६० जण आहेत . व्हाट्स अँप वरून लोकांचे आकडे घेतले जातात, फोन पे, गुगल पे , पेटीएम द्वारे पैसे घेतले जातात. स्मार्ट पद्धतीने मटका घेतला जात आहे आणि खेळविला जात आहे. मुंबई, कल्याण असे चार मटका सुरु असून, त्यावर दररोज किमान १० लाखाची उलाढाल होत आहे. आप्पाच्या घरातच सर्व कलेक्शन केले जात आहे. .
हा "आप्पा " शहरातील एका नामांकित खासगी बँकेत दिवसभर बसून व्हाट्स अँप वर फक्त कलेक्शन मोजत आहे. "आप्पा" राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाला असल्याने आणि पोलिसांना महिन्याला ठराविक हप्ता पोहच होत असल्याने पोलीस कारवाई करायला कचरत आहेत.
शिवसेनेने निवेदन दिल्यानंतर आप्पा खासगीत गप्पा मारताना म्हणतो की , माझा धंदा बंद केला की , पोलिसांचा हप्ता बंद होतो. पोलिसाना पगार परवडत नाही. हप्ता बंद झाला तर पोलीस उपाशी मरतील.
या आप्पावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने शहरातील दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थंड आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या स्टाईलने आंदोलन करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.