चोरीची फिर्याद देण्यास गेलेल्या दोन तरुणावर खोटा गुन्हा दाखल
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार सुरूच आहे. पान टपरीवर उभ्या असलेल्या एका तरुणास बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आल्यानंतर सोमवारी याच आनंदनगर पोलिसांविरुद्ध आणखी एक तक्रार पोलीस अधीक्षकांकडे दाखल झाली आहे.
उपळे ( मा. ) येथील महेबूब इलाही शेख याचे आरटीओ ऑफिससमोर मैत्री ऑनलाइन सर्व्हिस सेंटर आहे. दि. १७ ऑगस्टच्या मध्यंतरी या सेंटरमध्ये चोरी होवून कॉम्प्युटर आणि रोख रक्कम चोरीस गेली. या चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी महेबूब इलाही शेख हा तरुण १८ ऑगस्ट रोजी सकाळी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, बिट अंमलदार घटनास्थळी भेट दिल्यानंतर गुन्हा दाखल करतील, असे सांगितले.
त्यानंतर बिट अंमलदार बोचरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गेल्यानंतर महेबूब इलाही शेख आणि त्यांचा मित्र राहुल रणजित रोडे हे दुपारी चारच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, मुंडे मॅडम यांनी, तक्रार न घेता, "माझे आयुष्य लोकांची घाण काढण्यातच चालले" म्हणून तुम्ही दुकानाच्या रक्षणासाठी वॉचमन ठेवायचा असा सल्ला दिला.
त्यानंतर मुंडे मॅडम यांनी, सपोनि भारत बलैय्या बलैया यांच्याकडे घेऊन गेले असता, त्यांनीही फियादीस अर्वाच्च भाषा वापरली . यावेळी मुंडे मॅडम यांनी चव्हाण साहेब आल्यानंतर त्यांना विचारून तक्रार घेते म्हणून चोरीची तक्रार घेण्यास नकार दिला. सायंकाळी पोलीस निरीक्षक चव्हाण आले असता, त्यांनीही फिर्यादीस चोरीला गेलेलं सामान आणि पैसे तुझ्या तू शोध म्हणून तक्रार घेण्यास नकार दिला.
त्यानंतर महेबूब इलाही शेख आणि त्यांचा मित्र राहुल रणजित रोडे हे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी जात असताना, बिट अंमलदार बोचरे यांनी मध्येच फोन करून साहेब तुझी तक्रार घेण्यास तयार आहेत म्हणून परत पोलीस स्टेशनला बोलावले, त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली पण फियादी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे का गेला याचा राग मनात ठेवून फियादीवरही शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलम ३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलाम १२० प्रमाणे गुन्हा दाखल करून आपले खरे रूप दाखवले.
गोपनीयपने पोलीस ठाण्यातील छायाचित्रण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
फियादी महेबूब इलाही शेख आणि त्याचा मित्र राहुल रणजित रोडे हे शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर गदा आली आहे.
दरम्यान, आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याबद्दल अनेक लोकांच्या तक्रारी असताना, वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यांची लातूरला बदली झाली असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.