धाराशिव लाइव्हचा दणका : अतिक्रमणधारक व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव - नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला होता.
हा आदेश देऊन १४ दिवस झाले तरी बांगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याप्रकरणी धाराशिव लाइव्हमध्ये दि. ६ सप्टेंबर रोजी बातमी प्रकाशित होताच, नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड आणि शहर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना जागा आली असून, आज व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम
तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे केले आहेत. नगर पालिकेची जागा असताना, बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करत असताना त्यांना नोटीसा देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला होता. पण केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आदेश काढून पालिका मुख्याधिकारी वसुधा फड गप्प होत्या तर शहरात एकच अतिक्रमण आहे का ? असे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख दुर्लक्ष करीत होते.
व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याकडुन पालिका मुख्याधिकारी वसुधा फड आणि पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खुश करण्यात आल्याने गुन्हा दाखल होत नव्हता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर आज व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध अखेर आज शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.