कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर प्रकरणी केशेगावच्या दोन डॉक्टरसह आठ आरोग्य कर्मचाऱ्यावर ठपका
उस्मानाबाद - येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी श्रीमती जी. बी. मुधोळकर , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली मेश्राम , आरोग्य सहाय्यका श्रीमती ए आर. शेरीकर यांच्यासह आठ कर्मचाऱ्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी आता जिल्हा आरोग्य अधिकारी दोषी कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. उस्मानाबाद लाइव्हने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात एकूण ३५ महिलांची नोंदणी झाली होती, यावेळी एचआयव्ही टेस्टसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले पण किटवर नाव न लिहिल्यामुळे दोन महिलांना खोटा रिपोर्ट देवून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्याकडे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी व संबंधित रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते ,त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दोन अधिकाऱ्यांची चौकशीसाठी नियुक्ती केली होती. या चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. चौकशी अधिकाऱ्यांनी आठ आरोग्य कर्मचाऱ्यावर ठपका ठेवला आहे.
काय आहे प्रकरण ?
उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील दोन महिला केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या असता, त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दि. २६ मे रोजी उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित शिबीरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी भरती केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ मे रोजी सर्व ३५ महिलांची कोव्हीड टेस्ट करण्यात आली तसेच एच. आय. व्ही टेस्टसाठी रक्त नमुने घेण्यात आले. पण किटवर प्रत्येक महिलांचे नाव किंवा नंबर लिहिण्यात आले नाही, त्यामुळे सावळा गोंधळ उडाला. ३५ पैकी २ महिलांना एच. आय. व्ही. ची बाधा झाली आहे, पण ज्यांना बाधा झाली त्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ज्यांना बाधा झाली नाही त्यांना एच. आय. व्ही पॅाजीटीव्ह घोषीत करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील दोन्ही महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल देण्यात आली आणि ऐनवेळी एच. आय. व्ही. झाल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनी खासगी लॅबमधून तपासणी केली असता, रिपोर्ट निल आला, त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दुसऱ्यांदा तपासणी केली असता, येथेही रिपोर्ट निल आला. यावरून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचा रिपोर्ट खोटा निघाला.
धारूर येथील दोन महिलांना एच. आय. व्ही. झाला नसताना एच. आय. व्ही. झाल्याचे सांगून मानसिक त्रास देणे, प्रत्येक टेस्टसाठी पैसे उकळणे, भूल देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपासून वंचीत ठेवणे यास सर्वस्वी जबाबदार केशगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील असून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती.
या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
चौकशीतील निष्कर्ष
- दिनांक २७ मे २०२२ रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबाद येथे बिन टाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगाव स्तरावरून नियोजनाचा अभाव दिसून आला, यासाठी दोन्ही वैद्यकीय अधिकारी व एलएचव्ही यांच्याकडून हलगर्जीपणा झाला.
- सदर शिबिराकरिता नियोजन म्हणून ड्युटी चार्ज लावणे अपेक्षित होते परंतु ड्युटी चार्ज किंवा शिबिरामध्ये कोण कर्मचारी काय काम करणार याची जबाबदारी वाटप आदेश निर्गमीत करण्यात आला नाही, ड्युटी चार्ज लावणे ही जबाबदारी आरोग्य सहाय्यका श्रीमती ए आर. शेरीकर यांची होती परंतु त्यांनी आदेश काढला नाही व दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांनी याचा पाठपुरावा केल्याचे दिसून आले नाही.
- शिबिरासाठी दाखल लाभार्थ्यापैकी आठ लाभार्थीची एच. आय . व्ही . तपासणी आरोग्य सेविका श्रीमती जे. एल. सस्ते व श्रीमती एस. एस. दारफळकर यांनी एचआयव्ही किटचा वापर करून केली, एचआयव्ही किट क्रमांक एक मध्ये अहवाल पॉझिटीव्ह असताना देखील लाभार्थी क्रमांक एक व लाभार्थी क्रमांक दोन मध्ये सभ्रम निर्माण करून दोन्ही आरोग्य सेविका यांनी गुंतागुंत निर्माण केली.
- शिबिरावेळी ड्युटी चार्ज नसल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला व त्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली.
संबंधित बातम्या
एचआयव्ही झाला नसताना खोटा रिपोर्ट देवून दोन महिलांची फसवणूक