एचआयव्ही झाला नसताना खोटा रिपोर्ट देवून दोन महिलांची फसवणूक
धाराशिव ( उस्मानाबाद ) - धाराशिव ( उस्मानाबाद ) येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरात झालेल्या सावळ्या गोंधळाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
धाराशिव ( उस्मानाबाद ) येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात एकूण ३५ महिलांची नोंदणी झाली होती, यावेळी एचआयव्ही टेस्टसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले पण किटवर नाव न लिहिल्यामुळे दोन महिलांना खोटा रिपोर्ट देवून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्याकडे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी व संबंधित रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती.
धाराशिव तालुक्यातील धारूर येथील दोन महिला केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या असता, त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दि. २६ मे रोजी उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित शिबीरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी भरती केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ मे रोजी सर्व ३५ महिलांची कोव्हीड टेस्ट करण्यात आली तसेच एच. आय. व्ही टेस्टसाठी रक्त नमुने घेण्यात आले. पण किटवर प्रत्येक महिलांचे नाव किंवा नंबर लिहिण्यात आले नाही, त्यामुळे सावळा गोंधळ उडाला. ३५ पैकी २ महिलांना एच. आय. व्ही. ची बाधा झाली आहे, पण ज्यांना बाधा झाली त्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ज्यांना बाधा झाली नाही त्यांना एच. आय. व्ही पॅाजीटीव्ह घोषीत करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील धारूर येथील दोन्ही महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल देण्यात आली आणि ऐनवेळी एच. आय. व्ही. झाल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनी खासगी लॅबमधून तपासणी केली असता, रिपोर्ट निल आला, त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दुसऱ्यांदा तपासणी केली असता, येथेही रिपोर्ट निल आला. यावरून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचा रिपोर्ट खोटा निघाला.
धारूर येथील दोन महिलांना एच. आय. व्ही. झाला नसताना एच. आय. व्ही. झाल्याचे सांगून मानसिक त्रास देणे, प्रत्येक टेस्टसाठी पैसे उकळणे, भूल देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपासून वंचीत ठेवणे यास सर्वस्वी जबाबदार केशगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील असून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती.
या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.