अणदूरच्या निकृष्ट कामाची झेडपीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून पाहणी 

सात ठिकाणी गळती आढळली, गोलमाल पंचनामा 
 
s
राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करण्याची  तक्रारदार बाळसाहेब सुभेदार यांची  मागणी 

धाराशिव - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवासला आज ( शनिवारी ) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी छताला  सात ठिकाणी  गळती लागल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, चौकशीच्या  भीतीने कंत्रादाराच्या प्रतिनिधीने दुरुस्ती सुरु केली आहे. 

दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन गोलमाल पंचनामा केल्याने या कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून तपासणी करण्यात यावी , अशी मागणी तक्रारदार बाळसाहेब सुभेदार यांनी केली आहे. 


 अणदूर येथील श्री खंडोबा मंदिर पाठीमागे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या भक्त निवासचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे, त्याची बातमी धाराशिव लाइव्ह, झी 24 तास, सकाळ मध्ये प्रकाशित होताच, सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देऊन या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता निरिक्षक यांच्याकडून तपासणी करून संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनाची मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने दखल घेऊन,  अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवासला तातडीने भेट देऊन पाहणी करावी तसेच याप्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना दिले होते. त्यानंतर जाधव हे आज अणदूरला आले होते. 

काय आहे प्रकरण ?

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि  निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आले आहे. १६ लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट  करण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली आहे. 

श्री खंडोबा भाविकांसाठी हे भवन बांधण्यात आले असले तरी तिथे जाण्यासाठी  नीट रस्ता नाही. सगळीकडे मातीचे ढिगारे पडले आहे. काँक्रीट ( गिलावा ) अत्यंत निकृष्ट आहे. पाण्याचा स्लोप नसल्यामुळे भवनच्या भितींवर पाणी झिरपत आहे, कलर देखील अर्धवट देण्यात आला आहे. कुठलेही सुशोभीकरण नाही. संडास, बाथरूम नाही. पाण्याची व्यवस्था नाही.  लाईटची व्यवस्था नाही, जुन्या भिंतीवर पिलर उभे करण्यात आले आहेत. 


फलकावर धारूर येथील कंत्राटदार निलेश शिंदे याचे नाव दिसत असले तरी  सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने हे काम अत्यंत बोगस  करून शासनाच्या किमान आठ लाख रुपये लाटले आहेत . 

चौकशीच्या भीतीने दुरुस्ती 

या बोगस कामाची चौकशी होणार असे वृत्त धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर कंत्राटदार निलेश जाधव ( धारूर ) यांचा स्थानिक  प्रतिनिधी दयानंद मुडके यांनी या कामाची दुरुस्ती सुरु केली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या भेटीतच सात ठिकाणी गळती दिसून आली आहे. 

हे निवास भवन  जुन्या भिंतीवर पिलर उभे करून तयार करण्यात आले आहे. कुठलेही सुशोभीकरण नाही. संडास, बाथरूम नाही. पाण्याची व्यवस्था नाही.  लाईटची व्यवस्था नाही, कंपाउंड वॉल नाही. अंदाजपत्राला बगल देऊन हे काम करण्यात आले आहे. या कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून तपासणी करण्यात यावी , अशी मागणी तक्रारदार बाळसाहेब सुभेदार यांनी केली आहे. 

श्री खंडोबाचे दर्शन 

s

या कामाची पाहणी करण्यासासाठी आलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव आणि अन्य अधिकाऱ्यानी जाता जाता श्री खंडोबाचे दर्शन घेतले. श्री खंडोबा निष्पक्षपणे रिपोर्ट देण्याची सुबुद्धी अधिकाऱ्याना देवो, अशी प्रार्थना ग्रामस्थ करीत आहेत. 

 

s

 

s


संबंधित बातमी 

अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती

धाराशिव लाइव्हचा दणका : अणदूरच्या निकृष्ट कामाची तपासणी होणार
 


 

From around the web