अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आले आहे. १६ लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट करण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली आहे.
श्री खंडोबा भाविकांसाठी हे भवन बांधण्यात आले असले तरी तिथे जाण्यासाठी नीट रस्ता नाही. सगळीकडे मातीचे ढिगारे पडले आहे. काँक्रीट ( गिलावा ) अत्यंत निकृष्ट आहे. पाण्याचा स्लोप नसल्यामुळे भवनच्या भितींवर पाणी झिरपत आहे, कलर देखील अर्धवट देण्यात आला आहे. कुठलेही सुशोभीकरण नाही. संडास, बाथरूम नाही. पाण्याची व्यवस्था नाही. लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे भाविकांनी अंधारात बसावे का ? असा प्रश्न पडला आहे.
फलकावर धारूर येथील कंत्राटदार निलेश शिंदे याचे नाव दिसत असले तरी सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने हे काम अत्यंत बोगस करून शासनाच्या किमान आठ लाख रुपये लाटले आहेत . या कार्यकर्त्याने गावात अनेक बोगस कामे केल्यामुळे ही कामे लोकांच्या विकासासाठी आहेत की कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी सुरु आहेत ? असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा अभियंता यावेळी काय करत होता ? अशी विचारणा होत आहे.
जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अत्यंत भ्रष्ट असल्याने या कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करून, बोगस काम करणाऱ्या कंत्रादारांचे बिल न देता त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.
कामाचे स्वरूप
- योजना - ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- अंदाजित रक्कम - १६ लक्ष
- कंत्रादाराचे नाव - निलेश शिंदे ( धारूर )
- काम सुरु - २/१२/२२
- काम पूर्ण - २८ / २/ २३
- निवारण कालावधी - ३६ महिने
- विशेष म्हणजे फलकांवर काम सुरु झाल्याचा दिनांक २/ १२/२३ आणि पूर्ण झाल्याचा दिनांक २८ / २/ २३ लिहिण्यात आल्याने बोर्ड फलक लिहणाऱ्याचे आणि काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याचे नाव कोणत्या बुकात लिहावे ? असा प्रश्न पडला आहे.
- या भवनला स्थानिक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी करावी तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार आणि जिल्हा परिषद अभियंत्याची हजेरी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.