उस्मानाबाद तहसिलच्या अभिलेख विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु
उस्मानाबाद - उस्मानाबाद तहसिल कार्यालयात नकलेच्या प्रतीसाठी एका पान - पेज साठी चक्क ३० रुपये आकारले जात होते. याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या मदतीने उस्मानाबाद लाइव्हने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद तहसिल कार्यालयात कागदपत्रांच्या नकल प्रतीसाठी दररोज शंभराहून अधिक अर्ज येतात. एक तर नक्कल प्रत वेळेवर दिली जात नाही तसेच अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते. विशेष म्हणजे पावती मागितली असता दिली जात नाही. नकलेसाठी एका पान / पेज साठी दहा रुपये आणि अर्जंट असेल तर २० रुपये असा दर आहे. तसेच नागरिकांना पावती देणे बंधनकारक आहे.
उस्मानाबाद तहसील कार्यालयात नागरिकांची लूट ( व्हिडिओ )
तहसिल कार्यालयात दररोज नकलेच्या प्रतीसाठी किती अर्ज आले, याचे रेकॉर्ड ठेवले जात नाही, किती रक्कम आली याचीही स्वतंत्र नोंद वही (कॕश बुक) ठेवले जात नाही, तसेच नकलेसाठी जमा झालेली रक्कम दररोजच्या दररोज चलनद्वारे बँकेत भरली जात नाही, त्यामुळे दररोज जमा होणारी पाच ते सात हजार रक्कम कोणाच्या घशात जाते, असा आरोप सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला आहे.
याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने बाळासाहेब सुभेदार यांच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून बातमी दिली असता, सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्याना दिलेल्या पत्रात त्यांनी सुभेदार यांचा अर्ज जोडून अर्जाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून अहवाल विनाविलंब कार्यालयास सादर करावा, असे म्हटले आहे.