धाराशिव लाइव्हचा दणका : नायब तहसीलदार राजाराम केलुरकर लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
धाराशिव - धाराशिवच्या सर्किट हाऊसमध्ये स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केली म्हणून नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांची उमरगा येथे निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे. केलुरकर यांना आता एका लाच प्रकरणात एसीबी पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. धाराशिव लाइव्हने हे लाचेचे प्रकरण प्रसिद्ध केले होते.
तहसीलच्या पुरवठा अधिकाऱ्यांची वसुली जोरात ( व्हिडीओ )
उस्मानाबाद शहरात एकूण ३५ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शहर आणि तालुका मिळून २११ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांच्याकडून किमान दरमहा तीन हजार रुपये हप्ता घेतला जात आहे. त्याचे एकूण कलेक्शन सहा लाख ३३ हजार होत आहे.त्याचे वाटेकरी ठरलेले आहेत.वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे 'अंधेर नगरी चौपट राजा' अशी परिस्थिती आहे.
असा केला जातो काळाबाजार
गोरगरीब शिधापत्रिका धारकांना दरमहा गहू, तांदुळ, साखर, डाळ वाटप करण्यासाठी प्रत्येक दुकानदारांना कोटा दिला जातो, मात्र एकाद्याच्या नावावर १५ किलो धान्य असेल तर दहा किलोच दिले जाते. प्रिंटर खराब असल्याचे कारण सांगून पावती दिली जात नाही. तसेच दुकान कधी उघडले जाते तर कधी नाही अशी परिस्थिती असते. धान्य अजून आले नाही म्हणून नेहमी परत पाठवले जाते.
कोरोना लॉकडाऊन काळात अनेक गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली. शासन एकीकडे मोठ्या प्रमाणात धान्य पाठवत असताना, त्याचे वाटप न करता धान्याचा काळाबाजार करण्यात आला. त्यात रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी मालामाल झाले.
असे केले जाते कलेक्शन
तुम्ही तिकडे काळाबाजार करा, आम्हाला दरमहा तीन हजार रुपये हप्ता द्या, असा अलिखित आदेशच असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार निर्ढावले आहेत. कलेक्शन करण्यासाठी पुरवठा अधिकऱ्यांनी काही दलाल नेमले आहेत.हे दलाल ठराविक तारखेला हप्ता गोळा करून अव्वल कारकूनाच्या हाती देत आहेत, तेथून वरिष्ठ अधिकाऱ्याना ठरलेला हप्ता जात आहे. आलेला हप्ता तहसील कार्यालयातच मोजला जात आहे.
एसीबीच्या जाळ्यात ( vIdeo )
हे वृत्त धाराशिव लाइव्हने २ डिसेंबर २०२० रोजी व्हिडीओसह प्रसिद्ध केले होते. अखेर अडीच वर्षानंतर केलुरकर यांना लाच प्रकरणात एसीबी पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे.
राजाराम इरण्णा केलुरकर, वय - 56 वर्षे, रा. श्री आई निवास, लक्ष्मी धाम काँलनी, लातुर (तत्कालीन नायब तहसीलदार, पुरवठा, उस्मानाबाद. सध्या नेमणूक तहसील कार्यालय उमरगा. वर्ग 2) यांनी तीन स्वस्त धान्य दुकानदाराकडून ९ हजार लाच घेतली म्हणून हा गुन्हा दाखल होत आहे.
यातील तक्रारदार व त्यांचे 02 मित्र यांचे रास्त भाव धान्य दुकानाचे धान्य मागणीपत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी यातील आलोसे याने तिघांचा 03 महिन्याचा मासीक हप्ता असे एकुण 9000/- रूपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली आहे. आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर यांनी ही कारवाई केली.