नूतन कार्यकारिणीवरून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी 

फक्त दोनच महिला प्रतिनिधीची वर्णी  
 
नूतन कार्यकारिणीवरून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी
अल्पसंख्याक प्रतिनिधींना डावलले 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली, त्यात फक्त दोनच महिला प्रतिनिधींना स्थान देण्यात आले असून, अल्पसंख्याक प्रतिनिधींना डावलण्यात आले आहे, तसेच यात काही प्रभावहीन कार्यकर्त्याचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी वाढली आहे. 


राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तारूढ असले तरी जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांना तुळजापुरात दारुण पराभव पत्करावा लागला होता तर काँग्रेसचे दुसरे नेते बसवराज पाटील यांनाही  औश्यात पराभवाची धूळ चाखावी लागली होती. काँग्रेसला ताकद देणारा नेता नसल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस अधिक कुमकुवत झाली आहे. 

सध्याचे चित्र पाहिले असता, उमरगा,लोहारा, तुळजापूर वगळता उस्मानाबाद,कळंब, वाशी ,भूम - परांड्यात काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय आहे. या  पाचही तालुक्यात एकही जिल्हा परिषद सदस्य नाही . नगरसेवक म्हटले तर उस्मानाबादला दोन, भूमला दोन, परांड्यात दोन इतकेच आहेत.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे नाना पटोले यांच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड धीरज कदम पाटील यांनी १७  महिन्यानंतर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.  यामध्ये  मतदारांशी नाळ नसलेल्या कार्यकर्त्यांना व आपल्या जवळ बसणाऱ्या कार्यकर्त्यांना पदांची खिरापत वाटण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. 

 कार्यकारणीमध्ये प्रभावी भाषण करणारा व पब्लिक खेचणारा एकही पदाधिकारी नाही.  जातीचा समतोल राखून कार्यकारिणी निवडण्यात आलेली नाही, एमआयएमला रोखू शकणारा एकही अल्पसंख्याक कार्यकर्त्यास संधी देण्यात आलेली नाही.अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती आसिफ मुल्ला ,नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी  यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. 

युवक काँग्रेसच माजी जिल्हाध्यक्ष दर्शन कोळगे ,कळंब तालुक्यात पकड असलेले युवक माजी जिल्हाध्यक्ष आपासाहेब शेळके, उस्मानाबाद विधानसभा युवक माजी अध्यक्ष अनंत लंगडे, परांड्याचे ऍड खडसरे यांचाही कार्यकारिणीमध्ये  समावेश करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था  गलीतगात्र असताना कार्यकारिणी निवडताना भेदाभेद, जातीभेद करण्यात आल्याने उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी  वाढली आहे. ही  सुंदोपसुंदी पक्षाला अधिक मारक ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

अशी आहे कार्यकारिणी 

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर

From around the web