पत्रकार रणदिवे प्रकरणात नगर परिषदेचे मुख्याधिकारी येलगट्टे चौकशीच्या फेऱ्यात

विभागीय चौकशी प्रास्ताविक का करू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस 
 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या समता नगर मधील अवैध कॉम्प्लेक्स प्रकरणी उस्मानाबाद नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आपली विभागीय चौकशी प्रास्ताविक का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येलगट्टे यांना बजावली आहे.

धनंजय रणदिवे यांनी उस्मानाबाद शहरातील समता नगर मेन रोडवर जे कॉम्प्लेक्स बांधले आहे, त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अवैध केल्याची तक्रार रोखठोक युवा सामाजिक  कार्यकर्त्या सपना किसनराव माळी  यांनी उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे  यांच्याकडे २७ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती, पण त्यांनी कोणतेही कारवाई न केल्याने माळी यांनी येलगट्टे यांचे विरूध्द जिल्हाधिकारी , उस्मानाबाद यांच्याकडे ४ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रार केली होती. 

या तक्रारीनंतर  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांना खुलासा विचारला असता, त्यांनी  गुळगुळीत खुलासा केला होता. हा खुलासा अमान्य करून येलगट्टे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात होती. त्यावर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम वैध असल्याचे कळवले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी क्रॉस चेक करण्यासाठी सर्व कागदपत्रे मागितली होती.  

d

मात्र एक महिना झाला तरी येलगट्टे यांनी कोणतेही कागदपत्रे सादर केली नाहीत. रणदिवे प्रकरणात वारंवार लेखी आणि तोंडी सूचना देऊनही कोणतीही कारवाई केली नाही. येलगट्टे यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार विभागीय चौकशी प्रस्तावित का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येलगट्टे यांना  बजावली आहे.तीन दिवसांत मागणी केलेल्या सर्व कागदपत्रासह समक्ष हजर राहून खुलासा सादर करावा अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल, अशी तंबीही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येलगट्टे यांना दिली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद शहरात समता नगर भागात अकबर रहिमतुल्ला शेख यांची जागा असून, तळमजला आणि पहिला त्यांच्या मालकीचा आहे. धनंजय रणदिवे यांनी पहिल्या मजल्यावरील स्लॅबची जागा  विकत  घेऊन,दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे  बांधकाम अवैधरित्या केले आहे. या  कॉम्प्लेसचा पाया अत्यंत कुमकुवत असून, यामुळे तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील गाळेधारक अडचणीत सापडले आहेत . 

d

एक तर कॉम्प्लेक्सला साइड पार्किंग नाही, चोहोबाजूनी मोकळी जागा सोडलेली नाही, FSI ( चटई निर्देशांक ) नाही, तसेच  बांधकाम परवान्यातील नियम आणि अटींचे उल्लंघन केलेले आहे. 

 याप्रकरणी नगर पालिकेने धनंजय रणदिवे यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना,  मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांनी हेतुपुरस्करपणे कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे स्वतः  मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणता दणका देणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

यापूर्वीचे वृत्त 

पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या अवैध कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकरणी न.प. मुख्याधिकारी अडचणीत

पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या समता नगरमधील अवैध कॉम्प्लेक्स प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक

From around the web