धाराशिव लाइव्हचा दणका : तहसीलच्या अभिलेखापालाची एक वेतनवाढ रोखली
धाराशिव ( उस्मानाबाद ) तहसिल कार्यालयात नकलेच्या प्रतीसाठी एका पान - पेज साठी चक्क ३० रुपये आकारले जात होते. याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या मदतीने उस्मानाबाद लाइव्हने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर त्याची अभिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांची विभागीय चौकशी झाली, चौकशीमध्ये वाघमारे दोषी आढळल्या असून, त्यांना शिक्षा म्हणून एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे तसेच ३२० इतकी रक्क्म त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
धाराशिव ( उस्मानाबाद ) तहसील कार्यालयात कागदपत्रांच्या नक्कल प्रतीसाठी दररोज शंभराहून अधिक अर्ज येतात. एक तर नक्कल प्रत वेळेवर दिली जात नाही तसेच अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे, विशेष म्हणजे पावती मागितली असता दिली जात नाही. तहसील कार्यालयात दररोज नकलेच्या प्रतीसाठी किती अर्ज आले, याचे रेकॉर्ड ठेवले जात नाही, किती रक्कम आली याचीही स्वतंत्र नोंद वही (कॕश बुक) ठेवले जात नाही, तसेच नकलेसाठी जमा झालेली रक्कम दररोजच्या दररोज चलनद्वारे बँकेत भरली जात नाही, असे दिसून आले होते.
धाराशिव ( उस्मानाबाद ) तहसील कार्यालयात नकलेसाठी नागरिकांची कशी लूट केली जाते याचे स्टिंग ऑपरेशन सुभेदार यांनी केले होते आणि उस्मानाबाद लाइव्हने ते प्रसारित केले होते. त्यानंतर सुभेदार यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असता, या अर्जावरून उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे खुलासा मागितला असता, त्यांनी गोलमाल खुलासा करून भिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण सुभेदार यांनी हे प्रकरण उचलून धरले असता, आता अभिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांची विभागीय चौकशी झाली, त्यात वाघमारे या दोषी आढळल्या आहेत.
संबंधित बातम्या
उस्मानाबाद तहसील कार्यालयात नागरिकांची लूट ( व्हिडिओ )
उस्मानाबाद तहसिलच्या अभिलेख विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु