अगोदर उस्मानाबादला मेडिकल कॉलेज सुरु करा, मग नाव ठरवा ... 

 
अगोदर उस्मानाबादला मेडिकल कॉलेज सुरु करा, मग नाव ठरवा ...

उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव दिल्लीच्या भारतीय चिकित्सा परिषद ( मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया ) कडे जाईल, त्यानंतर या परिषदेचे एक पथक पाहणीसाठी उस्मानाबादला येईल, त्यानंतर सर्व अटीचे पालन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेडिकल कॉलेजला खऱ्या अर्थाने मंजुरी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार बजेट देईल , सातशे कोटी बजेट आल्यानंतर उस्मानाबादला मेडिकल कॉलेजची इमारत, विविध यंत्रसामुग्री उभी राहील, त्यानंतर कर्मचारी भरती केली जाईल आणि मग उस्मानाबादला मेडिकल कॉलेज सुरु होईल. 

हे सर्व होण्यास किती कालावधी लागेल, हे कुणी सांगू शकत नाही. त्याच्या अगोदरच उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजला अमुक - अमुक नाव द्या, म्हणून मागणी होत आहे. उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचने केली आहे तर महाविद्यालयास संत श्री गोरोबा काकांचे नाव द्यावे, अशी मागणी हभप निलेश झरेगावकर आणि काही वारकरी संप्रदायातील  लोकांनी केली आहे. त्यानंतर भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन एका शिष्टमंडळाला दिले आहे. 

नाव काय द्यावे यावरून आताच  राजकारण सुरु झालं आहे. त्यावरून वाद देखील सुरु झाला आहे. नावावरून राजकारण  करणं अत्यंत चुकीचं असून, वाद करणं त्याहून अधिक हानिकारक आहे. शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करा म्हणून उस्मानाबादबरोबर परभणीकरांची मागणी होती. उस्मानाबादला ही  मागणी मान्य  झाली. नावावरून वाद सुरु झाल्यास उस्मानाबादचे मेडिकल कॉलेज परभणीला गेल्यास शंख फुंकण्याची वेळ येईल. काही वर्षांपूर्वी उस्मानाबादला मंजूर झालेले कृषी महाविद्यालय उस्मानाबादला जागा नाही म्हणून परभणीकरानी  पळविले, त्यानंतर अनेक शासकीय कार्यालये लातूरकरानी  पळविले. आता उस्मानाबादला मंजूर झालेले शासकीय मेडिकल कॉलेज उस्मानाबादलाच सुरु झाले पाहिजे, यासाठी सर्वानी काळजी घेण्याची गरज आहे. 


उस्मानाबादला पहिल्यांदा शासकीय मेडिकल कॉलेज सुरु होऊ द्या. त्याचे नाव उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असू द्या. एकदा महाविद्यालय सुरु होवून एक वर्षे झाले की  मग खुशाल नावाची मागणी करा. मात्र त्यावरून राजकारण किंवा वाद न करता सर्वानुमते नाव  ठरवा. परंतु मेडिकल कॉलेज सुरु होण्याअगोदर अमुक -अमुक नाव द्या, म्हणून राजकारण आणि वाद करणे शोभा न देणारे आहे. विशेषतः लोकप्रतिनिधीनी  विशेष काळजी घेण्याची गरज आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या भूमिकेवरून सध्या वाद पेटला आहे. त्यांच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरु आहे. त्याकरिता आमदार आणि खासदार यांनी नावावरून भूमिका जाहीर न करता महाविद्यालय लवकरात लवकर कसे सुरु होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तर सामाजिक कार्यकर्त्यांनी संयम दाखवण्याची गरज आहे. 


सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह  

From around the web