कुणी उस्मानाबाद म्हणा, कुणी धाराशिव म्हणा किंवा नागेशनगरी म्हणा ! पण ... 

 
कुणी उस्मानाबाद म्हणा, कुणी धाराशिव म्हणा किंवा नागेशनगरी म्हणा ! पण ...

उस्मानाबादच्या नामांतरावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झालं आहे. उस्मानाबाद नगर पालिकेची  निवडणूक नोव्हेंबर २०२१ मध्ये होणार आहे. म्हणजे निवडणुकीस अजून आठ महिने बाकी आहेत. निवडणूक जवळ आली की ,  राजकीय मंडळींना नामांतराचा मुद्दा आठवतो आणि निवडणूक संपली की पुन्हा कुणी नामांतराचे नाव काढत नाही. 

उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक पेज आणि  ट्विटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आल्यानंतर तापला आहे. त्यानंतर भाजपने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवून ही मागणी उचलून धरली, त्यानंतर शिंदे यांनी ही जनतेची मागणी असल्याचे सांगून शासन लवकरच निर्णय घेईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर भाजपने शहरात  काही ठिकाणी 'नमस्ते धाराशिव' फलक लावून नामांतराचा मुद्दा तापवला आहे. 

दुसरीकडे  काही बौद्ध समाज  बांधवानी  उस्मानाबादचे  नामांतर नागेशनगरी करण्याची मागणी केली आहे. १९९५ मध्ये नामांतराचा मुद्दा सुरु असताना यशपाल सरवदे यांनी नागेशनगरीची  मागणी उचलून धरली होती. आता पुन्हा नागेशनगरीची मागणी जोर धरत आहे. 

१९९५ मध्ये शिवसेना आणि भाजपचे युती शासन सर्वप्रथम सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, मंत्रिमंडळ  बैठकीत उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा ठराव मंजूर केला होता, त्यानंतर नामांतर विरोधी लोकांनी त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात चार याचिका दाखल केल्या आणि या ठरावास न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यानंतर सन  २००० मध्ये  विलासराव देशमुख  मुख्यमंत्री झाल्यानंतर हा ठराव रद्द करून खंडपीठात दाखल झालेली याचिका निकाली काढली. 

२५ वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे नामांतर मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात आता शिवसेनेसोबत भाजप नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. काँग्रेसचा नामांतरास विरोध आहे. राष्ट्रवादीची भूमिका गोलमाल आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत  येणार का ? आला तर मंजूर होणार का ? हे एक कोडेच आहे. एक तर ठराव येणार नाही, आला तरी मंजूर होणार नाही आणि जरी मंजूर झाला तरी प्रकरण न्यायालयात गेले  की स्थगिती येणार, हे ठरलेले आहे. 


ही  सर्व वस्तुस्थिती माहित असताना नामांतराचा मुद्दा काढून उस्मानाबादच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. उस्मानाबादच्या विकासाच्या बाबतीत कुणी बोलायला तयार नाही. उस्मानाबाद नगर पालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. गेल्या पाच वर्षात उस्मानाबाद शहराचा काय विकास केला ? हे  नगराध्यक्षांनी जाहीररीत्या सांगावे. त्यांनी एक पुस्तिका काढून जनतेला वाटप करावी, त्यावर किमान विचारमंथन होईल. 


उस्मानाबादला उन्हाळ्यात १५ दिवसाला नळाला पाणी येते. सध्या आठ दिवसाला पाणी येते. १२० कोटीची उजनीची  पाणी पुरवठा योजना मातीमोल झाली आहे. शहरात रस्त्याची वाट लागली आहे. भुयारी गटार  योजना अनेक वर्षांपासून मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दहा वर्षांपूर्वी अजित पवार यांनी, उस्मानाबादला भुयारी गटार  योजना मंजूर झाल्याशिवाय उस्मानाबादला तोंड दाखवणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर ते अनेकवेळा उस्मानाबादला आले, पण कुणी त्याची आठवण करून दिली नाही, आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्मानाबादला भुयारी गटार  योजनेचे आश्वासन दिले आहे. 


पूर्वी लातूर हे उस्मानाबाद जिल्ह्यात  होते. १९८२ मध्ये लातूर वेगळे झाले. लातूर कुठल्या कुठे गेले,मात्र  उस्मानाबादची प्रगती झाली नाही.घराचे बंगले झाले, गल्लीच्या कॉलन्या झाल्या पण उस्मानाबाद जैसे थे ! एखाद्या वाढलेल्या वृक्षासारखा... जिल्ह्याचे  ठिकाण असले तरी एखाद्या सुधारित खेड्यासारखी अवस्था आहे.  दर शनिवारी , रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी शहरात अघोषित संचारबंदी सारखे वातावरण असते.  केवळ सरकारी कर्मचाऱ्यावर शहरात थोडीबहुत  उलाढाल सुरु असते. लोक खरेदीसाठी सोलापूर किंवा बार्शी पसंद करतात. 

उस्मानाबादच्या एमआयडीसी मधील लघुउद्योग थंड आहेत. कौडगाव एमआयडीमध्ये मोठा उद्योग यायला तयार नाही. विद्यापीठ उपकेंद्र झाले पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही. आता मेडिकल कॉलेजचे गाजर दाखवले जात आहे. त्यात पीपीपी अट आहे. हे कॉलेज बड्या पुढाऱ्याच्या संस्थेला चालवण्यास गेले की  गरीब मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. 

नावात काय आहे असे म्हटले जाते. कुणी उस्मानाबाद म्हणा, कुणी धाराशिव म्हणा किंवा कुणी नागेशनगरी म्हणा, पण उस्मानाबादच्या विकासाच्या बाबतीत थोडं तर बोला. उस्मानाबादचा विकास का होत नाही ? त्याला जबाबदार कोण ? डॉ. पद्मसिंह पाटील अनेक वर्षे आमदार, मंत्री होते. पाटबंधारे मंत्री असताना उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्यासारखा पैसा  आला. पाणी आडवा, पाणी जिरवा म्हणत पैसा देखील जिरला. डॉ. पाटील यांनी काहीच विकास केला नाही म्हणून बोंबा मारणारे आज सत्तेवर आहेत. आता राजकीय नेतृत्व देखील बदलेले आहे. खासदार शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष देखील शिवसेनेचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. मग आता काय अडचण आहे. उस्मानाबादच्या मागण्या आता तरी मंजूर होणार आहेत की  नाही ? आता त्यांनी नामांतराचा मुद्दा काढण्यापेक्षा विकास कामावर भर द्यावा.

एक वेळ नामांतराचा ठराव बाजूला ठेवा पण भुयारी गटार योजना असेल , ड्रेनेजचा प्रश्न असेल, शहरातील रस्ते असतील, नाल्या असतील, बागबगीच्या असेल ते सर्व अगोदर प्रश्न सोडवा.भाजीमंडईचा प्रश्न लोंबकळत पडलेला आहे. भाजी विक्रेते उघड्यावर भाजी विकतात, आठवडी बाजारात कायमस्वरूपी भाजी मंडई  केव्हा बांधणार आहात  ?  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी परवाच्या उस्मानाबाद दौऱ्यात उस्मानाबादचा  168 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर आहे, असे सांगितले. मग अडचण कुठे आहे? कुणी अडवलं आहे ? उस्मानाबादच्या जनतेला आता विकास हवा आहे. तुम्ही भले धाराशिव म्हणा पण आमचा आता विकास करा. 

नामांतर करून उस्मानाबादचा विकास होणार नाही. धार्मिक रंग देवून भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकरण करा. आपण मागे का आहोत, याचा विचार कुणी करणार आहे की नाही ? शहराचं  नामांतर हे एखाद्या माणसाचे नाव बदलण्यासारखे सोपे नाही. मग नामांतराचा हट्टाहास कश्यासाठी ? स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी राजकीय मंडळींनी नामांतराचा मुद्दा उपस्थित करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरु केली आहे, मात्र जनतेने राजकीय मंडळींच्या डोळ्यात अंजन घालण्याची गरज आहे. लोकांनी राजकीय मंडळींच्या नादी लागून नामांतराची मागणी उचलून धरण्यापेक्षा विकासाचे प्रश्न मांडावे. लोकप्रतिनिधीला जाब विचारावा. 

निती आयोगाच्या निकषात देशात सर्वात मागास जिल्ह्यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा मागासलेलापणाचा शिक्का कधी पुसणार आहे ? गडचिरोली सुद्धा सुधारले , आपण कधी सुधारणार आहोत ?  तरुण येथे नोकरी मिळत नाही म्हणून पुणे, मुंबई गाठतो. आता गावातच नोकरी किंवा कामधंदा मिळेल असे काही तरी करा. शहराचं नामांतर करून विकास होणार नाही. त्यातून तणाव निर्माण करण्यापेक्षा तणावमुक्त असे काही तरी करा. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 
उस्मानाबाद 
Mobile - 9420477111
dhepesm@gmail.com

.................................


# या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा, त्याचे स्वागत केले जाईल. 


 

From around the web