'त्या' जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा...
Tue, 21 Apr 2020
सर्वसामान्य नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम मोडले तर त्यांच्यावर कोव्हीड १९ अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो. तोच नियम उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना का लावला जात नाही? असा प्रश्न अनेक उस्मानाबादकरांना पडला आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांनी लॉकडाऊनचे नियम मोडून पुणे वारी केल्याचे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी एस.जी.केंद्रे यांनी औरंगाबाद वारी केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सीईओ डॉ. संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, केवळ नोटीस देवून बोळवण करू नका. सर्वसामान्य माणसाला जे नियम लावले जातात, जसे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्याप्रमाणे या दोन्ही अधिकाऱ्यावर तात्काळ कोव्हीड १९ अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यांचे उपचारानंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद एकीकडे लोकांना झाला असताना, जिल्हा परिषदेच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आल्याने लोकांत संताप आहे. या दोन अधिकाऱ्यामुळे कोरोना मुक्त उस्मानाबाद जिल्हा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची फॅमिली पुणे, औरंगाबाद, सोलापूर अश्या ठिकाणी आहे. हे अधिकारी पदाचा गैरवापर करून आपल्या फॅमिलीला गुपचूप भेटावयास जात आहेत.असा लोकांचा आरोप आहे. दोन अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला, पण अजून असेच काही अधिकारी आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
ज्या अधिकाऱ्यानी लॉकडाऊनचे नियम मोडले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा कायदा हा फक्त सर्व सामान्य नागरिकांसाठीच असतो, असा संदेश जाईल.
-सुनील ढेपे