सांगा पंकज देशमुख, कोणाच्या आदेशाने नाळेची बदली केली ?

 
सांगा पंकज देशमुख, कोणाच्या आदेशाने नाळेची बदली केली ?


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्याच्या वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं.यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. त्यानंतर ईडीचा ससेमिरा वाधवान कुटुंबाच्या मागे सुरु झाला आहे.  याच वाधवानचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 

साधारणत: दीड वर्षापूर्वी दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 6 व 7 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्राचे नंदनवन असणार्‍या महाबळेश्‍वरात हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या घरघरीने अख्खे महाबळेश्‍वर हादरले. अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी आपली चिल्लीपिल्ली पंखाखाली घेतली. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर होवूनसुद्धा महाबळेश्‍वरात अनिल अंबानी व कपिल वाधवानचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. ऐन हंगामामध्ये कोणीतरी तालेवारच आला असणार, अशी चर्चा महाबळेश्‍वरच्या मार्केटमध्ये घुमू लागली. मात्र त्याच रात्री महाबळेश्‍वरमध्ये हेलिकॉप्टरचे बेकायदेशीर लॅण्डिंग तसेच टेक ऑफ झाल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना समजली. कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकार्‍याला ही गोष्ट खटकली. त्यांनी तत्काळ महाबळेश्‍वर तहसिलदारांकडे याबाबतची माहिती विचारली. त्यावेळी या दोन्ही हेलिकॉप्टरनी कोणतीही परवानगी न घेता लॅण्डिंग तसेच टेक ऑफ केल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवले. परंतु ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचाय, त्या काही साध्यासुध्या आसामी नव्हत्या. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, हे अंबानी, वाधवानना समजताच त्यांनी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना फोन करून चक्रे फिरवली. 

 त्यानंतर गुन्हाच दाखल झाला नाही, उलट  तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी  हेलिकॉप्टर प्रकरण उकरुन काढले म्हणून नाळेंची बदली महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यातून फलटणला तडकाफडकी केली. परंतु एव्हाना ही गोष्ट वार्‍यासारखी पसरली होती. यासंदर्भात त्यावेळी माध्यमांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याचा ना जिल्हा प्रशासनावर फरक पडला, ना पोलीस यंत्रणेवर. यानंतर ‘सातारा टुडे’ने हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न केला. परंतु अंबानी व वाधवानसारख्या धनदांडग्यांच्या विरोधात तक्रार द्यायला एकही माईचा लाल धजावला नाही. शेवटी सातारा टुडे च्या माध्यमातून याबाबतची तक्रार सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे दि. 4 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाने तत्काळ व उद्योगपती अविनाश भोसलेंच्या दबावाखाली येवून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. 

काल दि. 11 एप्रिल रोजी सातारा येथील आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन आयजी व सध्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. 
( संदर्भ  लेख - सातारा टुडे )     

या प्रकरणात मुख्य दोषी जसे तत्कालीन जिल्हाधिकारी आहेत, तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख देखील आहेत.  त्यांनी गुन्हा तर दाखल केला नाहीच उलट   तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची तडकफडकी बदली केली. त्यांनी कोणाच्या आदेशाने बदली केली, हे सर्वश्रुत आहे.  राज्य सरकराने या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची गरज आहे. पोलीस एखाद्या प्रकरणात स्वतःहुन फिर्यादी होऊ शकतात, परंतु  वाधवान प्रकरणात पंकज देशमुख बावरलेले दिसले. 

उस्मानाबादला असताना पंकज देशमुख यांची बरीच प्रकरणे गाजली होती. त्यांची पत्नी शासकीय स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होत्या, त्या पोलीस विभागाची गाडी वापरत होत्या, त्याचा भांडाफोड उस्मानाबादचे आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी माहितीच्या अधिकारात केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. 

सातारामध्ये कुचकामी ठरल्यामुळे एक वर्षाच्या आत पंकज देशमुख यांची पुण्यात बदली झाली. पुण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी होती, येथेही झोल केल्यामुळे त्यांची झोन क्रमांक ४ला बदली झाली. सध्या पंकज देशमुख यांच्या डोक्यावरवर सातारा हेलिकॉप्टर प्रकरण गरगर फिरत आहे. त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी,  अशी मागणी जोर धरत आहे. 


From around the web