कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ?

 
कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ?

उस्मानाबाद जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सध्या ग्रीन झोन मध्ये आहे. उद्या ३ मे नंतर या जिल्ह्यात काही अटी शिथिल होणार होत्या, पण एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा मोठ्या अडचणीत आला आहे.


सोलापूर जिल्हा हा रेड झोन मध्ये आहे. सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११० वर गेली आहे. सोलापूर शहर कोरोना बाबतीत हॉटस्पॉट असताना, सोलापुरात ड्युटी करणारा एक पोलीस कॉन्स्टेबल आपल्या मूळ गावी चिखली ( ता. उस्मानाबाद) येथे आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्या म्हणण्यानुसार तो २४ एप्रिल रोजी गावी आला होता. तो कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने चिखली गावात खळबळ उडाली आहे तर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 


मागे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी पुणे आणि औरंगाबाद वारी केल्याचे उस्मानाबाद लाइव्हने समोर आणल्यानंतर यावर आम्ही चिंता व्यक्त केली होती. सर्वसामान्य माणसाला जे नियम असतात, ते या शासकीय अधिकारी आणि पोलीस यांना का लागू नाहीत, अशी विचारणा केली होती.



अखेर ही भीती खरी ठरली आहे. केवळ एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या तिघांमुळे मागे उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला होता, नंतर ते तीन रुग्ण बरे झाले. गेल्या एक महिन्यात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य  आणि पोलीस यंत्रनेने रात्रंदिवस  मेहनत करून उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यात यश मिळवले होते. यावेळी आम्ही प्रशासनाचे कौतुक देखील  केले होते.


या सर्व मेहनतीवर पाणी  फिरवण्याचे काम काही झारीतील शुक्राचार्य  करीत आहेत. तो पोलीस कॉन्स्टेबल उस्मानाबाद जिल्ह्यात येताना ठिकठिकाणी त्याची चौकशी करण्यात का आली नाही  ? पोलिसांचे ओळखपत्र दाखवले की उस्मानाबाद जिल्ह्यात सहज प्रवेश मिळतो का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पोलीस कॉन्स्टेबलवर नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे  सर्वसामान्य माणूस अडकून पडला आहे. अधिकारी आणि पोलीस मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात ये- जा करीत असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.  सर्वसामान्य नागरिकांना वेगळे नियम आणि अधिकारी आणि पोलीस यांना  वेगळे नियम आहेत का ?

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे. आरोग्य आणि पोलीस यंत्रणा झटत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. असे असताना, काही शासकीय अधिकारी आणि पोलीस यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. अनेक अधिकाऱ्यांचे कुटूंब पुणे, सोलापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी राहते. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता जात आहेत, काही बाहेरगावाहून भेटण्यास येत आहेत.चिखलीतील पोलीस कॉन्स्टेबल सीमा सील असताना गावी कसा आला ? हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.

लॉकडाऊन मध्ये जे नियम मोडतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात, मात्र काही अधिकारी आणि पोलिसांचा सर्रास वावर होत आहे.  त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मुक्त प्रवेश दिला जात आहे.   अश्या बेफिकीर अधिकारी आणि पोलिसांमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा रेड झोन मध्ये आल्यास जनतेने पायातील हातात घेतल्यास नवल वाटू नये. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

From around the web