उस्मानाबाद जिल्हा : रेड झोनकडे वाटचाल !
Wed, 20 May 2020
आता यापुढे खरी कसोटी ...
तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता तेरा झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले, त्यात उस्मानाबाद शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. अन्य रुग्णांत तुळजापूर १, भूम १, लोहारा १, परंडा २, असा समावेश आहे. यापूर्वी कळंब तालुक्यातील पाच, परंडा तालुक्यातील एक आणि भूम तालुक्यातील एक अश्या सात जणांचा समावेश होता. नव्या आकडेवारीनुसार कळंब ५, परंडा ३, भूम २, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा प्रत्येकी १ अशी संख्या आहे. उस्मानाबाद जिल्हयाची वाटचाल आता रेड झोन कडे सुरु आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या कामगार, मजूर, लहान व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत ही संख्या एक लाख २३८ वर गेली आहे. ३० एप्रिल अखेर ७७ हजार २७९ नागरिक जिल्ह्यात आले. त्यानंतर २२ हजार ९५९ नागरिक जिल्ह्यात आल्याची प्रशासन दरबारी नोंद आहे. मात्र, प्रशासनाकडूनच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ९३४ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात आलेल्या व क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आहे.
मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठिकाणहुन आलेल्या लोकांमुळे कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत, मग इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश द्यायचा नाही का ? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही. जे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यतील लोक आहेत, ते आपल्या जिल्ह्यात येणारच. त्यांना कोणी रोखू शकत नाही. गावात, जिल्ह्यात काम मिळत नाही म्हणून अनेक जणांनी पुणे, मुंबई शहर गाठले होते. मात्र ही शहरे लॉकडाऊनमुळे कुलूपबंद असल्याने लोक आपल्या गावाकडे परतत आहेत. मोठ्या शहरात कोरोनाने हाहाकार उडवल्याने लोक जिवाच्या भीतीने गावाकडे येत आहेत, पण कोरोना त्यांचा येथेही पिच्छा सोडत नाही.
उलट गावाकडे आल्यानंतर त्यांचे जास्त हाल होत आहेत. गावाकडे आल्यानंतर त्यांना गावाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागत आहे. . याठिकाणी पाणी, शौचालय, जेवण या मूलभूत गरजा मिळत नसल्याने त्यांचा अधिक कोंडमारा होत आहे. क्वारंटाईन ठिकाणी कसल्याही आरोग्य सुविधा मिळत नाहीत, लोक समूहाने राहत आहेत, त्यामुळे ज्यांना कोरोना नव्हता, त्यांना गावाकडे आल्यानंतर एक दुसऱ्यामुळे कोरोना होत आहे.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी आजपर्यंत जवळपास दीडशे आदेश काढले. तब्बल ३७ दिवस हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवल्यानंतर १० मे रोजी आकाशवाणी वरून लोकांना कोरोना संदर्भात शपथ दिली. त्यानंतर ११ मे पासून सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले, एस.टी. देखील सुरु करण्यात आली होती, नेमके त्याच दिवशी जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण आढळला आणि अवघ्या ९ दिवसात १३ रुग्ण झाले. हा जिल्हा रेड झोन मध्ये येण्यास अवघे दोन रुग्ण कमी आहेत. संसर्ग वाढत राहिल्यास हा जिल्हा रेड झोन मध्ये येऊ शकतो.
उस्मानाबाद जिल्ह्यत ११ मे रोजी सुरु झालेले सर्व व्यवहार पुन्हा ठप्प झाले आहेत. अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनीकाढला आहे. लोकांनी आता जागृत होण्याची गरज आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कामासाठी बाहेर पडल्यास सार्वजनिक ठिकाणी वावरताना फिजिकल डिस्टन्स पाळण्याची गरज आहे. हा जिल्हा रेड झोन मध्ये येऊ नये याची जबाबदारी जशी प्रशासन, आरोग्य, पोलीस दलाची आहे, तशी लोकांची सुद्धा आहे. लोक आता तरी फिजिकल डिस्टन्स पाळणार का ?
- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह