उस्मानाबाद जिल्हा : रुग्ण वाढले ! जबाबदार कोण ?

 
उस्मानाबाद जिल्हा : रुग्ण वाढले ! जबाबदार कोण ?

तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या सात झाली आहे. या सात पैकी सहा रुग्ण मुंबईहून उस्मानाबाद जिल्ह्यात आले आहेत तर कळंबच्या  महसूल कर्मचाऱ्यास कोरोना कश्यामुळे झाला ?  हे अजून उमगलेच  नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. रुग्ण वाढत चालल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेची चिंता, काळजी वाढली आहे तर काही लोक भयभीत झाले आहेत.  


जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्यामुळे हा जिल्हा तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये होता. सुरुवातीला दिल्ली आणि मुंबईहुन आलेल्या तीन रुग्णामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते, परंतु हे तीन रुग्ण बरे झाल्यानंतर हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता, पुन्हा आता सात रुग्ण झाल्यामुळे हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आला आहे. तो रेड झोन मध्ये येऊ नये, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. 

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या कामगार, मजूर, लहान व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत ही संख्या एक लाख २३८ वर गेली आहे. ३० एप्रिल अखेर ७७ हजार २७९ नागरिक जिल्ह्यात आले. त्यानंतर २२ हजार ९५९ नागरिक जिल्ह्यात आल्याची प्रशासन दरबारी नोंद आहे. मात्र, प्रशासनाकडूनच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ९३४ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात आलेल्या व क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आहे.  

एखाद्या गावात मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणहून व्यक्ती आला तर त्याची नोंद नेमकी कोण ठेवायची, त्यांना क्वारंटाईन नेमके कुणी करायचे ? यावरून बराच गोंधळ उडालेला आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणी पाणी, शौचालय, जेवण्याची सोय नसल्याने अनेकजण सार्वजनिक ठिकाणी  क्वारंटाईनच न होता होम क्वारंटाईन होत आहेत. त्यातून किराणा, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक बाबीसाठी कोणी बाहेर पडला तर एकमेकांचा संसर्ग होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे. त्यासाठी प्रत्त्येकाने 'मीच माझा रक्षक' हे धोरण ठेवून सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडावर आणि चेहऱ्यावर मास्क बांधणे आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवणे गरजेचे आहे. 


आता कोरोना सोबत जगावे लागेल !  

 राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन ३१ मे पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे तर  कळंब तालुका कोरोनाचा  हॉटस्पॉट झाला आहे. सात पैकी पाच रुग्ण कळंब तालुक्यातील आहेत तर एक रुग्ण परंडा आणि एक रुग्ण भूम तालुक्यातील आहे. जे बाहेरून उस्मानाबाद जिल्ह्यात आले, त्यांचेच रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत, त्यांच्या संपर्कात न येणे हेच आपल्या हातात आहे. 

रुग्ण  वाढत चालले म्हणून काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना  फिजिकल डिस्टन्स पाळण्याची गरज आहे. तसेच स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवण्याची गरज आहे.सतत काम करून आरोग्य, पोलीस आणि प्रशासनावर ताण वाढत चालला आहे. रुग्ण वाढले तर त्यावरील नियंत्रण सुटणार आहे. त्यासाठी रुग्ण वाढू न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.


कोरोना लवकर हद्दपार होणार नाही, तो किमान अजून सहा महिने ते एक वर्ष राहणार आहे. कोरोनाने माणसाला बरेच काही शिकवले आहे. त्यातून धडा घेऊन आता प्रत्येकाला कोरोना सोबत चालावे आणि जगावे लागेल. त्यासाठी एकच मंत्र आहे, मीच माझा रक्षक ! 

-सुनील ढेपे, 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 
# 9420477111

From around the web