गलांडे गेले, पाटील आले, कोरोनाचे चांगभले !

 
गलांडे गेले, पाटील आले, कोरोनाचे चांगभले !


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवलेला आहे. दररोज किमान दोनशे नव्या रुग्णाची भर पडत आहे. चिंताजनक बाब म्हणजे दररोज किमान पाच ते सहा जण मृत्यू पावत आहेत. आतापर्यंत  जिल्ह्यात ६  हजार ५५५ रुग्ण आढळून आले असून, पैकी ४ हजार  ३१०  बरे झाले आहेत तर सद्यस्थितीत २२५०  जणांवर  उपचार सुरु आहेत.त्याचबरोबर  १९५  जण बळी गेले आहेत.


एप्रिल महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीला सहा रुग्ण निघाल्यानंतर कडक उपाययोजना आखल्यानंतर आहे ते रुग्ण बरे झाले आणि तब्बल ३७ दिवस हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता. मात्र जूनपासून रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान दोनशे रुग्ण आढळून येत आहेत, गंभीर बाब म्हणजे दररोज पाच ते सहा जण मृत्यू पावत आहेत.

मार्च महिन्यात समुद्रवणीच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने  एका रुग्णाला कोरोना संशयित म्हणून उस्मानाबादला पाठवले होते, तेव्हा  जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जो हलगर्जीपणा केला होता, त्या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत आणि चौकशी गुंडाळण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परंडा तालुक्यातील एक रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू पावला. त्याच्या बातम्या माध्यमात झळकल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे  आश्वासन दिले होते, मात्र अद्याप एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. आरोग्य मंत्री फक्त चौकशीचे आदेश देतात पण पुढे काही होत नाही, ही  राज्यातील परिस्थिती आहे.

 काही दिवसापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांना  सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि पदभार डॉ. धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. पाटील हे एका राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत, डॉ. पाटील यांना  आता मोठे कुरण भेटले असले तरी रुग्णाच्या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत तर आहेतच पण  मृत्यू दर वाढत आहे, ही  सर्वात चिंतेची बाब आहे. जे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, त्याना वेळेवर उपचार मिळत नाहीत ही  ओरड येऊ लागली आहे. ऑक्सिजन अनेक वेळा मिळत नाही, त्यामुळे रुग्ण दगावत आहेत.

जिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नाहीत म्हणून अनेकजण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत आणि खासगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरु आहे. विशेष म्हणजे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे खासगी हॉस्पिटल आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या अनेक  वैद्यकीय अधिकऱ्यानी  खासगी हॉस्पिटल थाटले आहे. त्यांचे सरकारी ड्युटी ऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये लक्ष असते.

खासगी हॉस्पिटलमध्ये  सुरु असलेली लूट, कोरोना  जोपर्यंत  आहे, तोपर्यंत सुरुच राहणार आहे. त्याला पायबंद कोण घालणार ?  हा प्रश्न अनुत्तरीय आहे.

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

From around the web