ऐका हो ऐका ! तेरणा आणि तुळजाभवानी कारखाना भाडेतत्वावर मिळणार !

 
sd

राज्यातील ३५ पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत निघाले आहेत.  कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून एक तर स्वतःचा खासगी साखर कारखाना त्याच परिसरात उभा  करायचा किंवा दिवाळखोरीत निघालेले साखर कारखाने कवडीमोल भावात विकत घ्यायचे हा गोरखधंदा राजकीय पुढाऱ्यांनी सुरु केला आहे. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांचे मनसुभे उधळले गेले आहेत. त्यानंतर कारखाने विकत न घेता तेच कारखाने नातेवाईकांच्या नावावर भाडेतत्वावर घेण्याचा घाट राज्यात घातला जात आहे. मग उस्मानाबाद जिल्हा मागे कसा राहणार ? 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरच होणार आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही सवंग घोषणा करण्यात आली आहे. 

तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखान्यापमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक देखील दिवाळखोरीत निघाली आहे. एका दिवाळखोर बँकेचा अध्यक्ष दिवाळखोर कारखाने भाड्याने देत आहे, पण हे भंगार कारखाने भाड्याने घेणार कोण ? हा एक गहन प्रश्न आहे. 

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळख असलेला ढोकी येथील  तेरणा शेतकरी साखर कारखाना सन  २०१२ पासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तेरणाकडे व्याजासह ४२५ कोटी थकबाकी आहे. कारखाना सध्या भंगारअवस्थेत असून हा सुरु करायचा  म्हटलं तर जवळपास ४० ते ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. ४० ते ५० कोटींमध्ये स्वतःचा खासगी साखर कारखाना उभा राहत असेल तर तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याचे धाडस कोण करेल ? 

s

हीच अवस्था तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्याची आहे. तुळजाभवानी कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची  १५० कोटी  थकबाकी आहे. हा कारखाना सात - आठ  वर्षे झाली बंद आहे. कारखाना सुरु करण्यासाठी किमान २५ ते ३० कोटी खर्च अपेक्षित आहे. 

हा कारखाना बंद पडण्याअगोदर सोलापूरचे भाजप नेते आ. सुभाष देशमुख यांनी दोन वर्षे आणि नंतर नळदुर्गचे मुंबईस्थित उद्योगपती अशोक जगदाळे यांनी  दोन वर्षे भाडेतत्त्वावर घेतला होता. मात्र माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि त्यांच्या सुपुत्राच्या हस्तक्षेपामुळे  त्यांनी काढता पाय घेतला. आताही तीच परिस्थिती आहे. मग हा कारखाना भाडेतत्वावर घेऊन कोण स्वतःच्या पायावर दगड मारून घेईल ?

उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघात राजकरण करायचे म्हटले की, तेरणा कारखाना लागतो. याच कारखान्यामुळे राजकरण सुरु होते आणि याच कारखान्यामुळे राजकरण संपते. राणा जगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे राजकरण याच कारखान्यामुळे सुरु झाले आणि दोघांचे संपले सुद्धा होते. मात्र राणा पाटील यांनी उस्मानाबाद सोडून तुळजापूर मतदारसंघ निवडला आणि ओमराजे यांनी आमदारकी सोडून खासदारकी निवडली.कारखान्याच्या अधोगतीला कोण जबाबदार असा प्रश्न जर विचारला तर दोघे एकमेकावर ढकलतात ? पण कारखाना सुरु करण्यासाठी केवळ आश्वासन देण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. 

तेरणा बंद पडल्यामुळे ढोकी परिसरातील अनेक उदयोगधंदे बंद पडले. कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले, शेतकरी सभासदांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले पण कोणाला त्याचे सोयरसुतक वाटत नाही. विधानसभा निवडणूक आली की, कारखाना सुरु करण्याचे आश्वासन दिले जाते पण भंगार कारखाना नेमका सुरु कुणी करण्याचा ? हे एक कोडेच आहे. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

( हा लेख कसा वाटला ते आमच्या व्हाट्स अँप वर नक्की कळवा - 7387994411 )

From around the web