कोरोनाने थैमान : आरोग्य यंत्रणा 'राम -भरोसे'... 

 ... अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही !
 
कोरोनाने थैमान : आरोग्य यंत्रणा 'राम -भरोसे'...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७९५ झाली आहे तर आतापर्यंत ७१० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू गेल्या चार दिवसात झाले आहेत. १४ एप्रिल - १४, १५ एप्रिल - १०, १६ एप्रिल -२३ आणि  १७ एप्रिल २० अश्या ६७ जणांचा गेल्या चार दिवसात मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबर सारीने सुद्धा जिल्ह्यात शिरकाव केला असून, १६ एप्रिल रोजी ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना, ऑक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालय रुग्णाने ओसंडून वाहत आहे. बेड शिल्लक नाहीत, रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे कुचकामी ठरले म्हणून डॉ. धनंजय पाटील यांना पदभार देण्यात आला, पण गलांडे बरे ! म्हणण्याची पाळी जनतेवर आली  आहे.  डॉ. पाटील हे एका राजकीय नेत्याचे नातेवाईक असल्याने त्यांना जाब विचारण्याची धमक कोणत्याही लोकप्रतिनिधींमध्ये नाही. त्यामुळे उस्मानाबादची आरोग्य यंत्रणा 'राम -भरोसे' सुरु आहे. 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यानी  मोठमोठे हॉस्पिटल थाटले आहेत. त्यांची कमाई जोरात सुरु आहे. डॉ. पाटील यांचे देखील हॉस्पिटल आहे. त्यांचा कारभार ढिम्म सुरु आहे. जिल्हा रुग्णलयात  भरती होणाऱ्या रुग्णावर वेळेवर उपचार होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सकारात्मक बातम्या लिहा म्हणून पत्रकारांना उपदेशाचे डोस  पाजले जातात मात्र वैद्यकीय अधिकारी सकारात्मक काम करीत नसल्याने पत्रकारांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचे का ? 

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, पालकमंत्री शंकरराव गडाख नगर सोडायला तयार नाहीत. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने अधिकारी निर्ढावले आहेत. पालकमंत्रांच्या नावे जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेच्या कामात  मलिदा खाण्यात शहराचे कारभारी मश्गुल आहेत. मागील वर्षी फवारणीचे नाटक करणारी कंपनी आता बंद पडली आहे. उस्मानाबाद शहरातील परिस्थिती  गंभीर आहे. मृत्यूचे आकडे वाचून लोकांना धडकी भरत आहे. 

जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कोरोना झाल्याने ते आराम करीत आहेत. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आरोप- प्रत्यारोप करण्यात वेळ घालवत आहेत. ही वेळ आणीबाणीची आहे. राजकारण करण्यापेक्षा सर्व लोकप्रतिनिधीनी एकत्र येवून या महाभयंकर संकटाचा सामूहिक मुकाबला करण्याची  गरज आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. 

राजकारण गेलं चुलीत ! 

लोकांना आता राजकारणाचा वीट आला आहे. कोण बरोबर आणि कोण चूक, हे तपासण्याची ही  वेळ नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्व  लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत कसा होईल,  रेमडेसिवीर इंजेक्शन कसे उपलब्ध होतील, हे लोकप्रतिनिधीने पाहिले पाहिजे, रुग्णसंख्या वाढल्याने बेडची संख्या कशी वाढवता येईल, हेही  पाहिले पाहिजे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन नियोजन केले पाहिजे. संकट मोठे आहे. ही  वेळ राजकरण करण्याची नाही. हातात हात घालून काम करण्याची आहे. 

-सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 


 

From around the web