उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे अपात्र

नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
 
s

उमरगा  - उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्यावर झालेल्या अनेक गैरव्यवहार प्रकरणी १६ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तथा नगर विकासमंत्री यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या चौकशीत दोषी आढळल्याने नगर विकास मंत्री यांच्या आदेशाने नगराध्यक्ष पदावर प्रेमलता टोपगे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे .

       नगराध्यक्षा टोपगे यांनी पदावर राहून नगरपरिषद अंतर्गत विविध कामे गैरवर्तन केल्यामुळे त्यांना दूर करणे बाबत १६ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केली होती चौकशी व लेखापरीक्षण यानंतर आलेल्या अहवालानंतर २६ मुद्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी १३ मुद्यांबाबत नगरसेवक संजय पवार व माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने लेखापरीक्षणाचे आदेश दिले होते.

             या तक्रारी प्रमाणे कळंब नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. या चौकशीत पदाचा गैरवापर, १० लाख मुरूम खरेदी घोटाळा, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवालात बोगस कागदपत्रे, खोट्या निविदा मंजूर करून वरिष्ठांची दिशाभूल करणे व पदाचा दुरुपयोग केल्याचे निष्पन्न झाले होते . त्यानंतर नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तीन वेळेस जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत दोन्ही पक्षांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले म्हणणे सादर केले होते. यात नगराध्यक्षांनी ७ मुद्यांबाबत तर तक्रारदार संजय पवार व १४ सदस्यांनी ६ मुद्यांबाबत युक्तिवाद केला होता. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गैरअर्जदार नगराध्यक्षा यांनी बेकायदेशिररित्या गैरवर्तन करून बनावट कागदपत्र तयार करून कर्तव्य पार पाडत असताना हयगय करून लज्जास्पद वर्तन केल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.

           औरंगाबाद न्यायालय, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व लेखा परीक्षण अहवाल यांचा आदेश व तक्रारीनुसार नगराध्यक्षा दोषी आढळून आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे नगराध्यक्षा कोविड पॉझिटिव्ह असताना बिलावर सही केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांना १९६५ चे कलम ५५ तरतुदीनुसार नगराध्यक्ष पदावर अपात्र ठरवण्यात येत आहे व ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत नगर परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवता येत नसल्याचे आदेश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.९ सप्टेंबर रोजी सायंकाळी दिला आहे . त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून काँग्रेस पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातो.


जनतेच्या पैशाचा नगरपालिकेत केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस आला हा नैतिकतेचा विजय आहे .
-  संजय पवार (तक्रारदार नगरसेवक )

... 

उमरगा नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणी प्रत्येक स्तरावर तक्रारी दाखल करून न्याय मागणी केली होती. त्याप्रमाणे कारवाई झालेली आहे. उमरगा शहरातील कर रूपाने गोळा झालेल्या पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झालेली आहे. भ्रष्टाचारातील पैसे वसूल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 

    अ.रजाक अत्तार,  माजी नगराध्यक्ष,   नगर परिषद उमरगा.

From around the web