राज्य सरकारच्या माध्यमातुन विमा एजंटाने कंपनीचा फायदा करुन दिलाच

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा राणा पाटलांवर निशाना
 
s

धाराशिव -   विमा कंपनीचा पैसा वाचविण्याची धडपड करणाऱ्या विमा कंपनी एजंटाने अखेर राज्य सरकारच्या मदतीने कंपनीचे अडीचशे कोटी रुपये वाचवून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले आहे. एवढा नतद्रष्टपणा करुनसुध्दा विमा दिल्याचे श्रेय घेणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांचे नाव न घेता लगावला.

पिकविमा प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला असुन त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काच्या अडीचशे कोटीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या बाजुला कंपनीचे तेवढेच पैसे वाचले असुन त्यासाठी धडपडलेल्या एजंटास किती बक्षिसी मिळाली असा प्रश्न देखील ओमराजे यानी विचारला आहे. विमा कंपनीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती त्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले आहे. 

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या प्रतिज्ञापत्रात एसडीआरएफ व एनडीआरएफच्या निकषानुसार विमा रक्कम देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी किमान साडेपाचशे कोटी रुपयाऐवजी ही रक्कम कमी होऊन 309 कोटीपर्यंत येणार आहे. त्यामुळे कंपनीला जवळपास अडीचशे कोटीचा फायदा झाला असुन मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मात्र अपेक्षेवर पाणी फेरले आहे. 

राज्य सरकारची मदत घेऊन विमा एजंटाने ही कंपनीचा फायदा केल्याचा आरोप ओमराजे यानी केला आहे. याचिका दाखल झाल्यापासुन एजंटाने पहिल्यापासुन कंपनीचे हित पाहिल्याचे आम्ही वारंवार पुरावे सादर केले आहेत. या निकालाची प्रत हातात आल्यावर 'दुध का दुध और पाणी का पाणी' होणार असल्याचे ओमराजे यानी म्हटले आहे.

From around the web