राणा पाटलांच्या खासदारकीच्या स्वप्नाला तानाजी सावंतांचा खोडा 

खा. ओमराजे निंबाळकर दुहेरी मनस्थितीत 
 
s

लोकसभा निवडणुकीला आणखी सात ते आठ महिने बाकी असले तरी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असून, हा मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिंदे गटाकडे जाणार ? याबाबत प्रचंड औत्सुक्य आहे. 


सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र होती. शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक रिंगणात होते. ओमराजे यांना ५ लाख ९६ हजार तर राणा पाटील यांना ४ लाख ६९ हजार मते पडली होती. मोदी लाटेत ओमराजे निंबाळकर यांचे गंगेत घोडे न्हाले होते. 

लोकसभेतील पराभव राणा जगजितसिंह पाटील यांच्या जिव्हारी चांगलाच  लागला होता,  सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटील यांनी पक्षच बदलला. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला . राणा पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात भाजप मजबूत आणि बळकट झाली आहे., हे कुणी नाकारू शकत नाही. 

मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आ. राणा पाटील यांनी कंबर कसली आहे. ओमराजे यांना आस्मान दाखवण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली आहे., पण त्याला खोडा घालण्याचे काम शिंदे गटाचे तानाजी सावंत (आरोग्य मंत्री तथा  पालकमंत्री , धाराशिव ) यांनी सुरु केले आहे. धाराशिवची जागा शिवसेनेची असून, शिवसेना आपला हक्क सोडणार नाही, अशी बाईट त्यांनी मीडियाला दिली आहे. 

मुळात धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद नगण्य आहे. या उलट ठाकरे गटाची जास्त आहे. ठाकरे गटाकडून ओमराजे फिक्स आहेत. ठाकरे गट , काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी झाली तर शिंदे गट पुरता हैराण होणार आहे. शिंदे गटाला जागा मिळाली तर स्वतः तानाजी सावंत यांना निवडणुक रिंगणात उतरावे लागणार आहे , ती तयारी सावंत यांनी केली आहे का ? हा मूळ  प्रश्न आहे. शिंदे गटात एक तर तानाजी सावंत किंवा माजी खासदार रवींद्र गायकवाड हे दोघेच इच्छूक आहेत. भाजपकडून स्वतः राणा पाटील इच्छूक आहेत. 

ओमराजे , दुहेरी मनस्थितीत 

मागील लोकसभा निवडणुकीत ओमराजे निवडणूक लढवायला तयार नव्हते, त्यांना विधानसभा लढवायची होती,  पण त्यांना बळेच उभे करण्यात आले आणि मोदी लाटेमुळे लॉटरी देखील लागली. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवची जागा शिंदे गटाकडे गेली तर लोकसभा आणि भाजपकडे गेली तर आ. कैलास पाटील यांना उभे करून विधानसभा निवडणूक लढवण्याची ओमराजेंची  सुप्त इच्छा आहे. पण उद्धव ठाकरे त्याला तयार होणार का ? हे एक कोडेच आहे. 


 

From around the web