धाराशिवमध्ये भकास @ 40 विरुद्ध  भंगार @16 बॅनरबाजी 

खा. ओमराजे निंबाळकर विरुद्ध आ. राणा पाटील समर्थकांत सोशल मीडियावर शीतयुद्ध
 
s

धाराशिव - शरद पवार यांचे  कट्टर समर्थक म्हणून धाराशिवचे डॉ पद्मसिंह पाटील यांची ओळख होती. ते  आमदार, पाटबंधारे मंत्री, गृहमंत्री नंतर खासदार झाले. ते जवळपास ४० वर्षे राजकारणात होते, परंतु धाराशिव जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही, हा जिल्हा मागास नव्हे भकास राहिला, असा आरोप विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे  मागील १६ वर्षांपासून करीत आले आहेत. 

 खासदार ओमराजे निंबाळकर  यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत २००६ मध्ये निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर ओमराजे निंबाळकर  यांचा राजकारणात उदय झाला होता. सुरुवातीपासूनच ते शिवसेनेत आहेत. २००९ च्या विधानसभा निवणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले, पण २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते २०१९ च्या निवणुकीत खासदार झाले. मोदी लाटेत त्यांना खासदारकीची लॉटरी लागली होती. सध्या ते शिवसेना ठाकरे गटात आहेत. 

दुसरीकडे डॉ पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचा २००४ मध्येच राजकारणात  प्रवेश झाला होता. कोणत्याही सदनाचे सदस्य नसताना त्यांना डायरेक्ट राज्यमंत्री करण्यात आले होते. कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला राम  राम  करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

दि. १६ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिवच्या दौऱ्यावर आले होते. शहरात फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर लागले होते. मोदी @९ निमित्त त्यांची जाहीर सभा होती, याचदिवशी शिवसेनेच्या ठाकरे  म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर गटाने शहरात लवकरच भकास @40  हे बॅनर झळकावले. त्याला आज भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील समर्थकांनी लवकरच भंगार @16 असे प्रत्युत्तर दिले आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे 10 वर्षे तेरणा कारखाना ताब्यात होता. त्यांच्या काळात तेरणा कारखाना बंद पडला. या कारखान्यातील भंगार चोरीला गेले. तसा  आरोप राणा जगजितसिंह पाटील समर्थकांनी खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर आजवर केला आहे. 

त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्यात भकास @40 विरुद्ध  भंगार @16 अशी बॅनरबाजी रंगली असून, सोशल मीडियावर  दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात चांगलेच भिडले आहेत. या दोन्ही कार्यकर्त्यात शीत युद्ध सुरु आहे. 

s


एकीकडे खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. राणा पाटील यांच्या समर्थकांत शीतयुद्ध रंगले असताना, त्यात पालकमंत्री तानाजी सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली असून, ना भंगार ! ना भकास ! आमचा दृष्टिकोन जिल्ह्याचा विकास !  ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब असे बॅनर आता झळकवण्यास सुरुवात केली आहे. तानाजी सावंत यांनीच तेरणा कारखाना भाडेतत्वावर घेतला आहे. 

From around the web