धाराशिव लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील - रवींद्र गायकवाड पुन्हा आमने - सामने ? 

 
xz

लोकसभा निवडणुकीला अजून सात ते आठ महिने अवधी असला तरी सर्वच राजकीय पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा  ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) , काँग्रेस आणि  राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी झाल्यास धाराशिव लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष  मागणार असून, माजी मंत्री बसवराज पाटील  निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत तर भाजप - शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये धाराशिवची जागा शिंदे गटाकडे गेल्यास माजी खासदार रवींद्र गायकवाड पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहे. असे झाल्यास बसवराज पाटील विरुद्ध रवींद्र गायकवाड यांची लढत पुन्हा एकदा रंगणार आहे. 

धाराशिव लोकसभा मतदार संघात धाराशिव- कळंब, तुळजापूर, उमरगा, परंडा , बार्शी, औसा  या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. धाराशिव- कळंब चे आमदार कैलास  पाटील हे  शिवसेना उबाठा  , तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि  औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे भाजपचे, परंड्याचे आमदार तानाजी सावंत आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले  हे शिवसेना शिंदे गटाचे , बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष असले तरी शिवसेना शिंदे गटाशी त्यांची जवळीक आहे. एकदंरीत रागरंग पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे या लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. 

विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना ( एकत्र ) आणि भाजप युतीकडून लढले होते. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्मामुळे त्यांना खासदारकीची लॉटरी  लागली होती.  सध्या ओमराजे शिवसेना ( उबाठा ) मध्ये असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे ओमराजे निंबाळकर लोकसभेसाठी फारसे इच्छूक नाहीत. त्यांचा डोळा धाराशिव - कळंब विधानसभा निवडणुकीवर असून, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास कॅबिनेट मंत्री होऊन पालकमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. 

ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेसाठी नकार दिल्यास काँग्रेस धाराशिवची जागा स्वतःकडे मागणार असून, माजी मंत्री बसवराज पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, असे काँग्रेसचे विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. विश्वजित शिंदे यांचे म्हणणे आहे.  इतकेच काय तर धाराशिवची जागा भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्या वाटणीत शिंदे गटाकडे जाणार असून, माजी खासदार रवींद्र गायकवाड रिंगणात उतणार आहे. हे दोघे  उमरग्यातील पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात.  १९९५, १९९९ आणि २००४  या तीन निवडणुका या दोघांनी एकमेकाविरुद्ध लढल्या होत्या. १९९५ मध्ये रवींद्र गायकवाड , १९९९ मध्ये बसवराज पाटील तर २००४ मध्ये पुन्हा रवींद्र गायकवाड विजयी झाले होते. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्याने रवींद्र गायकवाड यांनी लोकसभा तर बसवराज पाटील यांनी औसा मतदारसंघ पकडला. २००९ आणि २०१४ मध्ये बसवराज पाटील औसा  मतदारसंघात बाजी मारली तर रवींद्र गायकवाड हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. 

या दोघांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. राजकारणातील सर्व छक्के - पंजे दोघांना चांगलेच माहित आहेत. ऍड. ऍड. विश्वजित शिंदे यांचे भाकीत  खरे ठरल्यास धाराशिव लोकसभेची निवडणूक बसवराज पाटील विरुद्ध रवींद्र गायकवाड पुन्हा आमने - सामने येऊ शकतात.  मोदींची जादू कायम राहिल्यास रवींद्र गायकवाड  यांना  पुन्हा खासदारकीची लॉटरी लागू शकते, पण जादू नाही चालल्यास बसवराज पाटील यांचा दणदणीत मतांनी विजय होऊ शकतो. पण या सर्व बाबी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नकार दिल्यास घडू शकतात. जर ओमराजे निंबाळकर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार झाल्यास बसवराज पाटील यांच्या स्वप्नावर पाणी पडू शकते. 


 

From around the web