कोण म्हणतो मी म्हातारा झालो -  शरद पवार 

 
s

पाडोळी -  महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत, देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत गेली ५२ वर्षे मी सतत आहे. यामध्ये एक दिवसही सुट्टी मला लोकांनी दिली नाही. त्या जनतेने इतके वर्ष काम करण्याची संधी दिली. त्या जनतेचा, पुढील पिढीचा आणि समाजाचे भविष्य याचा विचार केला पाहिजे. माझ्या मते माझ्यावर ती जबाबदारी आहे. मला आता स्वतःसाठी काही मागायचे नाही. तुम्ही काही द्यायचे ठेवले नाही. चार वेळा मुख्यमंत्री केलं. कोणी झाला आहे का असा एकदा सोडून चार वेळा मुख्यमंत्री? आणि ५२ वर्ष निवडून देताय. आणखी काय हवं आयुष्यात. आता जो काही काळ असेल तो काळ लोकांच्या जीवनात परिवर्तन कसं होईल आणि ते राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव हे समृद्ध कसं होईल यासाठी देणं ही भूमिका माझी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. 

शरद पवार यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

माझा उल्लेख ८० वर्षाचा म्हातारा म्हणून केला. पण जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ मला आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही. इथे येण्याचा उद्देशच हा आहे. काही लोक आपल्याला सोडून गेले त्याची चिंता करण्याचे काम नाही. अशी परिस्थिती अनेकदा पहिली आहे. जे गेले ते गेले. पण माझी खात्री आहे की आजचा समाज आणि यातील तरुण पिढी ही कोणत्या जाती धर्माची आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्यांच्यामध्ये लोकांच्या भल्याची एक प्रकारची आस्था आणि काहीतरी उभे करण्याची धमक आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे याची गरज आहे. या भावनेतून मी इथे आलो, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्ध कशासाठी आहे, तर हे राज्य हिंदवी स्वराज्य म्हणून शिवछत्रपतींनी उभं केलं. त्या छत्रपतींनी कोणतीही जात, धर्म पाहिला नाही. देशात आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही अशी अनेक राज्य होऊन गेली. पण छत्रपतींनी कुठेही भोसले राज्य केलं नाही... तर हे राज्य हिंदवी स्वराज्य केलं. हिंदुस्थानच्या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य देणं आणि स्वतःचे राज्य प्रस्थापित करण्याची उमेद देणं, असे राज्य तयार करण्याची भूमिका छत्रपतींनी घेतली. त्यातून देशाचा इतिहास उभा राहिला. 

काही लोकांना पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नाही. महाराष्ट्र राज्यात कोणीतरी मध्यंतरी भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच आणि कोणीतरी त्यांना मोठ केलं. सावित्रीमाई फुले यांच्याबद्दलही भाष्य केलं. लोक मला विचारत होते काय करायचं? मी म्हटलं... सोडून द्या. असं नको ते बोलल्यानंतर यांच्या नादाला लागायला नको. यांच्याकडून फार ठीक काही बोलले जाणार नाही. म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की सगळ्या बाजूने राज्य पुढे नेण्यासाठी कुणाचा आदर्श ठेवायचा!

कर्तृत्व हे पुरुषांमध्ये असते तसे स्त्रियांमध्येही असते. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. ज्या शिवछत्रपतींचा उल्लेख आपण केला, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवलं जिजमातेने, महात्मा जोतिबा फुले यांनी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ज्ञानगंगा सुरू केली. मुलींसाठी स्त्री-शिक्षणाचा दरवाजा उघडला. समाजाचा विरोध असतानाही सावित्रीबाई यांनी ही ज्ञानगंगा स्त्रियांपर्यंत पोहचविण्याची कामगिरी केली. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली. उपेक्षित माणसांचे स्रोत जागे केले. हे करताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून रमाबाई उभ्या राहिल्या. या मतदारसंघाने काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एका तरुण मुलीला मोठ्या मताने विजयी केलं. आणि तिच्यातलं कर्तृत्व तिने आपल्या कामातून दाखवून दिलं. 

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबंध महाराष्ट्राच्या युवतींची संघटना तिच्या खांद्यावर आहे. कारण सगळ्यांना विश्वास आहे की कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली तर ते कर्तृत्व तिच्याकडे नक्की पाहायला मिळेल. असं कर्तृत्व दाखविण्याची संधी ज्यांच्यामध्ये आहे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, या भूमिकेतून मी या ठिकाणी आलो आहे.

जिल्ह्यातील काही प्रश्न आहेत. ते इथे मांडले गेले. पैकी पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा. भाषणाला उभे राहण्यापूर्वी मी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फोन करून इथली समस्या सांगितली. हा प्रश्न सोडविण्यासाठी इथल्या दोन प्रकल्पांबद्दल विचारले. त्यांनी उत्तर दिले की याचे टेंडर काढण्यात आले आहे... काही दिवसांतच आपल्याला मान्यता मिळेल.

देशात कोरोनाचे संकट आल्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कष्ट घेऊन लोकांना यातून बाहेर काढले. दुर्दैवाने यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले, अर्थव्यवस्था कोलमडली. या सगळ्याचा कुटुंबावर विपरित परिणाम होतो. अशी संकट आल्यावर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम राज्य सरकार करते आहे.

आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे. त्याच्या झळा आपल्याला लागतील. युक्रेन आणि रशिया यातील संघर्ष सुरू झाला आहे. आपल्या देशातील हजारो विद्यार्थी तिकडे शिक्षणासाठी गेले आहेत. अनेकांशी मी संपर्कात आहे. डॉक्टर होण्यासाठी अन्य देशात संधी आहे, हे ज्यावेळी लोक बघतात तेव्हा रशिया, युक्रेन, फिलिपिन्स, चीन येतं. आज युक्रेनमध्ये आपली हजारो मुलं अडकली आहेत. त्यांना त्या संकटात जगावे कसे हा प्रश्न पडला आहे. यासाठी केंद्र सरकारने काही पाउलं टाकली आहेत. त्यासाठी त्यांना सहकार्य नक्की करू. 

मला समाधान आहे की महाराष्ट्र सरकारनेही यात जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. हे मोठं संकट आहे. किती दिवस चालेल माहीत नाही. पण त्याचा दुसरा भाग म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत. 

ज्यादिवशी हे युद्ध थांबेल त्यानंतर एका मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल... ते म्हणजे महागाई. त्यातूनही आपल्याला मार्ग काढावा लागेल. तो मार्ग काढण्यासाठी राज्य एक विचाराने चालवायचे हा निकाल घेऊन पुढे जायचे आहे. पुढे येणाऱ्या संकटातून सामान्य माणसाची सुटका कशी होईल, याची खबरदारी घ्यायची आहे. हे काम महाराष्ट्रात ज्यांच्या हातात सत्ता आणि सूत्रं तुम्ही दिली त्यांच्यामार्फत मी खात्री देतो की श्री. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि त्यांचे सहकारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, असेही पवार म्हणाले. 

From around the web