टक्केवारीतून जमवलेल्या संपत्तीचा एवढा माज बरा नाही ... 

'तोंडपाटीलकी’ करताना वयाचे तरी भान ठेवा !
 
s
- अविनाश खापे पाटील

उस्मानाबाद  - आपण टक्केवारीची जी भाषा करताय ती आपले वडिल रॉयल स्टोनवर राहात असताना गोळा केलेल्या टक्केवारीबद्दल बोलताय का? तुम्ही म्हणे लोकांसाठी कामे करता आणि मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये जनतेची मोफत ऑपरेशनं करता, ही चांगलीच गोष्ट आहे.  पण त्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड घेऊन सरकारी योजनेतून उपचार करता, हेही सांगायला पाहिजे. ज्या ट्रस्टमार्फत हे हॉस्पिटल चालवले जाते ती सभासद शेतकर्‍यांच्या मालकीची असलेली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तुमचे आजोबा आणि कुटुंबीयांनी स्वतःच्या मालकीची कशी केली? हेही जनतेला उघडपणे सांगा आणि जनतेला कळू द्या. तुमचे वडिल आणि आजोबांनी टक्केवारीतून जमवलेल्या संपत्तीचा एवढा माज दाखवणे तुमच्या वयाला शोभत नाही. तुमच्या वडिलांची सात टक्क्यांची टक्केवारी तर जगजाहीर आहे, हे पण पुन्हा पुन्हा ओरडून सांगितले तर बरे होईल, असा पलटवार युवा सेनेचे अविनाश खापे पाटील यांनी केला आहे. 


आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी  विरोधकावर टीका करताना , मी खिसा झटकला तर तुझ्यासारखे पाच - पन्नास बाहेर पडतील असे म्हटले होते. त्यावर पलटवार करताना युवा सेनेचे अविनाश खापे पाटील म्हणाले की, 1980 च्या दशकात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांची म्हणून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झाली. पुढे ती आपल्या आजोबांनी स्वतःच्या कुटुंबीयाच्या नावे करुन घेतली. तरीपण शेतकर्‍यांना व त्यांच्या कुटुंबीयांवर औषधोपचार करावे असे आपल्या आजोबांना, वडिलांना कधी वाटले नाही. 

सन 2002 ला जेव्हा आमचे दैवत पवनराजेंनी तेरणा ट्रस्ट व त्याअंतर्गत मुंबईला असलेले मेडिकल कॉलेज  (जे उस्मानाबादसाठी मंजूर झाले होते) त्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा आपल्या कुटुंबीयांना शरम वाटली व जिल्ह्यात तेरणामार्फत आरोग्य सेवा सुरू केलीत. ते श्रेय सुद्धा पवनराजेंचेच.  नाहीतर तुमचं आपलं जनावरासारखं खाली मान घालून चरायला चालू होतंच की. तुम्हाला आम्ही पैशांबद्दल कधी बोललोच नाही. कारण तुमची प्रॉपर्टीच वीस हजार कोटीची आहे म्हणे. आता आमच्यासारखे पाच-पन्नास खिशातून बाहेर पडतील, असे सांगता. पण मग एवढी संपत्ती जमविली कुठून? याचेही उत्तर जाहीरपणे दिले तर बरे होईल. 


तुमचा नेता पॉवरफुल आहे म्हणता पण तो पैशांनी, आमच्या नेत्यांकडे जनतेच्या प्रेमाची पॉवर आहे. म्हणूनच तुमच्या सत्तेला इथून-तिथून जनतेनेच सुरुंग लावला आहे. चाळीस वर्षात जिल्ह्यातल्या सहकारी संस्था मोडीत काढून खिसे भरले. त्यामुळे तुम्हाला पैशांचे आम्ही बोलणार तरी कसे? ते तर सार्‍या जनतेला माहितच आहे. पण पर्याय नसल्यामुळे इतके दिवस जनतेने सहन केले. आता गोळा केलेले पाच-पन्नास लोकही तुम्ही फक्त खिसा झटकायलाच उशीर, तेही येत्या निवडणुकीपर्यंत गळून पडतील. तुम्हाला जनतेने ज्या-त्या ठिकाणी निवडणुकीतून झिडकारलेले तर आहेच, पण पैशांचा माज अजून गेला नसल्याचेच तुमच्या बोलण्यातून दिसून येतेय. 


आमच्या त्रिमूर्तींनी तुमच्या वडिलांचे कमिशनखोरीचं पितळ जनतेपुढे उघडं पाडलं म्हणून आपल्याला दुःख वाटणं साहजिक आहे. फक्त तुमची एक लबाडी जनतेसमोर मांडली तर एवढा थयथयाट करीत आहात. अजून बरीच प्रकरणे समोर आल्यानंतर मोफत उपचाराची तुम्हालाच गरज पडेल, हेही लक्षात ठेवा, असेहीअविनाश खापे पाटील यांनी म्हटले आहे. 

From around the web