कसबे तडवळ्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस पाटील यांच्या पॅनलचा पराभव 
 
as

उस्मानाबाद  - तालुक्यातील कसबे तडवळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीची निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस असलेले सुरेश पाटील यांच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवीत महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे सुरेश पाटील यांची गेल्या १० वर्षापासून असलेली सत्ता हातून हिसकावून घेतली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी २ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित १५ जागेसाठी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या विरुद्ध सर्व पक्षीयांनी पॅनल उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले होते. मतदाना दिवशी देखील प्रचंड ताणतणाव झाल्यामुळे निकाल कसा लागेल ? याकडे खुद्द ग्रामस्थांना देखील उत्सुकता लागली होती. मात्र ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून उमेदवारांमध्ये धाकधुकीचे वातावरण पसरु लागले होते. 

प्रभाग संख्या मोठी असल्यामुळे सरपंच पदासाठी कधी आघाडी तर कधी पिछाडी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवार स्वाती विशाल जमाले यांनी प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा उद्योजक सुरेश पाटील यांच्या पत्नी सरिता सुरेश पाटील यांचा ४२ मतांनी पराभव करीत विजय मिळविला. पत्नीचा पराभव झाला असला तरी सुरेश पाटील हे विजयी झाले आहेत हे विशेष. या निकालानंतर सर्वपक्षीय पॅनलला ११ तर विरोधी पॅनलला ६ जागा मिळविण्यात यश आले आहे.

From around the web