उस्मानाबादेत ठाकरे सेनेचे शिवसैनिक आक्रमक : पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकार्‍यांच्या तोंडाला फासले काळे !

 
d

धाराशिव - हक्काच्या पीकविम्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड करुन टाळे ठोकले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. तसेच पीकविम्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला. 

शिवसेनेचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तरीही पीकविमा कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना स्टाईल आंदोलनकरुन पीकविमा न मिळाल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांसह शेतकर्‍यांनी यावेळी दिला.

सोमवारी (दि.24) दुपारी आक्रमक शिवसैनिकांसह जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत शेतकरी पोलीस वसाहतीसमोरील पीकविमा कार्यालयासमोर धडकले. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या प्रती उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. तसेच हजर असलेल्या दोन अधिकार्‍यांच्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयाला टाळे ठोकले. या उग्र आंदोलनामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. तर शिवसेनेसह जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत शेतकर्‍यांना हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. 

d

शिवसेना स्टाईल आंदोलन दाखवून दिले - गुरव

जिल्ह्यातील 4 लाख 95 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झालेले असताना विमा कंपनीकडे केवळ 5 हजार शेतकर्‍यांचेच पंचनामे उपलब्ध असून तेही चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत. त्यामुळे विमा कंपनीने कृषी विभागाला तत्काळ पीक नुकसानीचे पंचनामे उपलब्ध करुन द्यावेत या मागणीसाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत कार्यालयाची तोडफोड करुन अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासले. बळीराजाला न्याय नमिळाल्यास आणखी उग्र आंदोलन करुन एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी यावेळी दिला.

पीकविम्याबाबत विमा कंपनीकडून दिशाभूल - जाधव

पीकविमा कंपनीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची वेळोवेळी दिशाभूल केली आहे. ज्यांनी पंचनामे केले त्यांना कोणतेही ज्ञान नाही. त्यातच एसडीआरएफ, एनडीआरएफमार्फत शेतकर्‍यांना नुकसानीची भरपाई मिळूवन देण्याचे आश्वासन देणार्‍या राज्यातील मंत्र्यांनीही शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने फासली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना जोपर्यंत पंचनामे उपलब्ध करुन दिले जात नाही तोपर्यंत जिल्हाभरात आंदोलन सुरूच राहतील, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे जनहित शेतकरी संघटनेचे अमोल जाधव यांनी दिला. 

s

या आंदोलनात शिवसेनेचे माजी नप गटनेते सोमनाथ गुरव,अतिष पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवासेना शहर प्रमुख रवी वाघमारे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, श्याम जाधव, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, नितीन शेरखाने, पंकज पाटील, गजेंद्र जाधव, अंकुश मोरे, विनोद केजकर, अजय नाईकवाडी, मनोज केजकर, खंडू काटे, किशोर साळुंके, संभाजी फरताडे, कारी शिवसेना शाखाप्रमुख अशोक बनसोडे, उमेश डोके, परिक्षित विधाते, राम मचाले, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, धाराशिव तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, नानासाहेब जाधव, माऊली दुधे, अण्णा कदम, नारायण लोेंढे, अभिजित लोंढे, शुभम माने, बापू वाघे यांच्यासह शिवसेना, जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

From around the web