ठाकरे सेनेला कोल्हापूरचा महापूर आठवतोय पण धाराशिव जिल्ह्यात वाहून गेलेल्या सोयाबीनच्या गंजी आठवतात का ?

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा पलटवार 
 
kale n

उस्मानाबाद -  ठाकरे सेनेला कोल्हापूरचा महापूर आठवतोय पण धाराशिव जिल्ह्यात वाहून गेलेल्या सोयाबीनच्या गंजी आठवतात का ? असा पलटवार भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. 

काळे म्हणाले की, मोदी लाटेवर निवडून आलेल्या ठाकरे सेनेच्या प्रतिनिधीना सध्या शेतकऱ्यांची प्रचंड चिंता सतावत आहे, शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यांनी एक प्रेसनोट काढून कोल्हापूरच्या धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालीच पाहिजे यात दुमत नाही मात्र ज्या कोल्हापूरच्या महापुराचे दाखले सेनेच्या प्रतिनिधीकडून दिले जात आहेत त्या कोल्हापुरात आलेल्या महापुराची परिस्थिती व 2021 या वर्षी धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेली महापुराची दुरवस्था एकसारखीच होती परंतु त्याची आर्थिक मदत धाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यात सेनेचे जिल्ह्यातील दोघे प्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले होते...याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठी दुरावस्था झाली होती,सर्व लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या पाणी नदीपात्राबाहेर पडून शेतात घुसले,नदीकाठच्या शेकडो एक्कर जमिनी 2 फुटांपासून 8-10 फुटापर्यंत खोलवर खरवडून गेल्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकाची काढणी करून लावलेल्या गंजी या महापुरात वाहून गेल्या होत्या तसेच शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा वाहून गेली होती.

जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला,याचे गांभिर्य प्रसारमाध्यमे व तत्कालीन विरोधीपक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या समोर मांडले,त्याचबरोबर तत्कालीन विरोधीपक्ष नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव लातूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या,तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रसारमाध्यमांनी शेतकऱ्यांचा टाहो शासनदरबारी मांडल्यानंतर ठाकरे सरकारच्या नेत्यांना जाग आली. 

ही दुरवस्था पाहून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापुरात बाधित शेतकऱ्यांना भेटी दिल्या,शरद पवार, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला यावरूनच जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचे गांभीर्य समजते,यावेळी  शरद पवार व उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या साक्षीने शेतकऱ्यांना भरघोस मदतीचे आश्वासन दिले गेले मात्र शेकडो एक्कर जमिनी खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना खरवडुन गेलेल्या जमिनी पुन्हा लागवडयोग्य बनवण्यासाठी पुरेशी मदत मिळाली नाही.ज्यांच्या सोयाबीनच्या गंजी वाहुन गेल्या त्याची किंमत लाखो रुपयांची होती मात्र 4-6 हजार रुपयांची मदत देऊन ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

जिल्ह्यातील या सर्व घडामोडी ठाकरे सेनेचे प्रतिनिधी विसरले असावेत मात्र अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला शेतकरी विसरलेला नाही.चालू वर्षात मराठवाड्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला पिकांचे नुकसान झाले  त्याचक्षणी भाजपा शिवसेनेच्या शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, ndrf च्या निकषांमध्ये दुप्पट वाढ करत 13600 रु. प्रतिहेक्टर मदत तसेच आजवर केवळ 2 हेक्टर पर्यंतच मदत मिळत होती यात वाढ करून 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे,या सर्व घोषणांवर अंमलबजावणी होत असताना केवळ स्वतःच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलेले अपयश झाकण्यासाठी सेनेचे प्रतिनिधी कागदी घोडे नाचवताना दिसत आहेत,मात्र आता जी जाग यांना आली तो सर्व प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे मिरवण्याचा आहे.

महाविकास आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते मात्र शेतकरी वर्गात फडणवीसांची निर्माण झालेली लोकप्रियता कमी करण्यासाठी फडणवीसांनी सुरू केलेल्या अनेक योजना बंद केल्या गेल्या किंवा मर्यादित केल्या गेल्या,शेतकऱ्यांना कोणत्याही संकटात आर्थिक मदत मिळाली नाही,त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना ठाकरेंचे शेतकरीविषयक अंतरंग किती बनावटी आहे याचा उलगडा झालाय, याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा वेगाने निर्णय घ्यायला सुरू केले आहेत, यामुळे अस्वस्थ होऊन ठाकरे सेनेचे प्रतिनिधी केवळ कागदावर ही चिंता दाखवताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांविषयी हे पुतना मावशीचे प्रेम असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव-तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे पुर्णतः सक्षमपणे काम करत आहेत आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही काळे म्हणाले. 

From around the web