उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रारुप आराखडा जाहीर, नव्या सहा गटांची भर

आता सदस्यांची संख्या 61; फेररचनेत अनेक गट नेस्तनाबूत, उमेदवारांची होणार कसरत !
 
zp obd

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारुप रचना आज (दि.2) जाहीर करण्यात आली आहे. पूर्वी 55 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत आता 61 गट असणार आहे. तर फेररचनेमध्ये अनेक गटांचे अस्तित्व संपल्यामुळे अनेक प्रस्थापित दिग्गजांना हादरा बसला आहे. पूर्वीच्या गटातील गावेही आता इतर गटांना जोडली गेली असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना नव्याने जनसंपर्क वाढविण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे नव्या प्रभाग रचनेवरुन दिसत आहे. 


उस्मानाबाद तालुक्यात पूर्वी 12 गट होते. यामध्ये दोन गटांची भर पडली असून आता तालुक्यात 14 गट असणार आहेत. तुळजापूर तालुक्यात 9 ऐवजी आता 10 गट तर लोहारा तालुक्यात 4 ऐवजी 5, परंडा तालुक्यात 5 ऐवजी 6 गट असणार आहेत. त्याचबरोबर नेहमीच चर्चेत राहिलेले उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर), कसबे तडवळे, अंबेजवळगा आणि पळसप हे पूर्वीचे गट नेस्तनाबूत झाले असून या गटातील गावे आता शेजारील आणि नव्याने तयार झालेल्या गटांना जोडली गेली आहेत. प्रारुप प्रभाग रचनेत  सारोळा (बुद्रुक), जागजी, आळणी, येडशी, करजखेडा आणि कारी हे गट नव्याने वाढलेले आहेत. 


नव्या रचनेमध्ये आता उस्मानाबाद तालुक्यात 14, तुळजापूर 10, कळंब 9, उमरगा 9,  लोहारा 5, परंडा 06, भूम 5, वाशी 3 असे एकुण 61 गट राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पूर्वी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सदस्य संख्येच्या जोरावर राजकारण होत असे. आता हेच राजकारण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे उस्मानाबाद, तुळजापूर आणि कळंब या तीन तालुक्यांमधील सदस्य संख्येचा मेळ घालून सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न होतील, हे निश्चित आहे. 


प्रारुप रचनेचा मसुदा जाहीर झाल्यानंतर त्यावरील हरकती नोंदविण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशात म्हटले आहे.

सविस्तर यादी पाहा 

उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज

From around the web