उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून 'कलगीतुरा ' रंगला !
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून आ. राणाजगजितसिंह पाटील आणि खा. ओमराजे निंबाळकर यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या आवश्यक असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करण्यास मागचे सरकार अपयशी ठरले आहे.अशी टीका भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे तर प्रथमत: नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा असे प्रत्युत्तर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले आहे.
उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या आवश्यक असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करण्यास मागचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या सर्व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय आयुक्त रवींद्र सिंग यांना मुंबईत बोलावून घेतले असून उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड हे त्यांच्या समवेत परिपूर्ण प्रस्ताव तयार करीत असून तो उद्या दि.५ सप्टेंबर रोजी केंद्राकडे पाठविला जाणार असल्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा तितकाच गंभीर विषय असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारल्याने हे महाविद्यालय केव्हा सुरू होईल असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र त्यापूर्वी आणखी एक बाब उजेडात आल्याने यात काही राजकारण आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन समित्यांनी पाहणी केली. त्यात राज्याच्या एका समितीचा समावेश होता तर दुसरी समिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची होती. राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवली तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समितीने मान्यता नाकारली. मात्र त्यात कोणत्या त्रुटी होत्या त्या समोर आल्या नाहीत. त्या समोर याव्यात अशी सामान्यांची इच्छा आहे. कोणाच्या दिरंगाई मुळे हा प्रश्न मार्गी निघण्यास अडचण झाली याची उकल करायची असेल तर त्रुटी आणि अहवाल समोर येणे महत्वाचे आहे.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बोलताना राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवल्याचे सांगितले मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारण्यासाठी ज्या गंभीर त्रुटी आहेत त्या मात्र सांगितल्या नाहीत. सरकार त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी एन एम सी कडे फेर तपासणी करण्याचा आग्रह देखील केला जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
प्रथमत: नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना धाराशिव जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर करण्यात आले होते तसेच चालू अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येवून आवश्यक त्या बाबींची पुर्तता करुन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले हे सर्व श्रुत आहे.
या गोष्टींचे आपणास श्रेय मिळत नसल्याने पोटसुळ उठलेले व स्वत:स जिल्ह्याचे भाग्यविधाता व पालकमंत्री समजणारे नेतृत्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटीं पत्रकार परिषदेत सांगून केंद्रीय मंत्री मनसुखजी मांडवीया यांची भेट घेवून याबाबत प्रयत्न करणार असल्याचे वृत्तपत्रातून वृत्त प्रसारित करत आहेत.
यांचा भुतकाळ पाहता 40 वर्ष सत्तेत विविध कॅबिनेट मंत्री पदी राहून तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना एकहाती ठेवून तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सन 1991 मध्ये मंजूर असलेले वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ ला स्थापित करताना मनाची व जनाची लाज न बाळगता नेरुळ नवी, मुंबई सारख्या ठिकाणी सुरु केले. या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांकडून करोडो रुपये कमवून महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत प्रयत्न करणे म्हणजेच “सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली” या उक्ती प्रमाणेच आहे, अशी घणाघाती टीका खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये जनतेला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रचंड आवश्यकता होती , त्या काळामध्ये नेरुळचे महाविद्यालय हे धाराशिवसारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या ठिकाणी असते तर रुग्णांना अत्यावश्यक सेवा देवून होणारी हेळसांड थांबवता आली असती. धाराशिव जिल्ह्यातील काही रुग्णांना नेरुळ येथील रुग्णालयातून मोफत उपचार केल्याबाबत कर्णाच्या उदारतेने सांगितले जाते पण हे करत असताना याची दुसरी बाजू जनतेपासून व स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी सविस्तरपणे लपवून ठेवली जाते. सदर रुग्णांचे उपचार हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून केले जातात हे आजपर्यंत सांगण्याचे धाडस का केले नाही याचा जनता आज ना उद्या जाब विचारेल त्यावेळेस उत्तर द्याल का ? नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय हे खाजगी मालमत्ता असल्यासारखे आपण वागत आहात याचे अगोदर तेरणा ट्रस्टच्या सभासदांना स्पष्टीकरण द्यावे ? तसेच आत्तातरी मनापासून धाराशिव जिल्ह्यातील जनतेसाठी काही करत आहोत हे बेगडी वागणे आणि पत्रकार परिषद थांबवून प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवले तर जिल्ह्यातील जनतेला आनंदच होईल आपण व आपले पिताश्री यांच्या कारकिर्दीचा परिपाक म्हणुन धाराशिव जिल्हा हा विकासापासून कोसो दुर राहिला आहे, अशी टीकाही खा. ओमराजे यांनी केली आहे.
उस्मानाबादला शासकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर श्रेयवाद रंगला होता , आता अपयशाचे खापर एकमेकांच्या माथी फोडणे सुरु झाले आहे.