आरोग्यमंत्री तानाजी सावंत माध्यमांवरच भडकले; म्हणाले - तुम्ही मला अंगठे बहाद्दर समजत का ?  तुमचे दांडके तुम्हालाच लखलाभ ... 

 
z

उस्मानाबाद - भूम परंड्याचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत माध्यमावर चांगलेच भडकले आहेत. तुम्ही मला अंगठे बहाद्दर समजत का ? तुम्हाला माझे शिक्षण माहित नाही का ? माझ्या अनेक शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत. माझ्याकडे अडीचशे - तीनशे पीएचडी होल्डर काम करतात, मी जे बोललोच नाही ते तुम्ही (माध्यमे) दाखवता. त्यामुळे तुमच्या तोंडावर हात लावायचा की दांडक्याला? मी जे बोललो ते तुम्ही दाखवतच नसाल तर मीडियाने परत माझ्यासमोर येऊ नये,  तुमचे दांडके तुम्हालाच लखलाभ असे म्हणत त्यांनी मीडियावर तोंडसुख घेतले,. 


राज्याचे नवनियुक्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका कथित वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. एका रुग्णालयाच्या भेटीदरम्यान डॉक्टरांना खडसावताना ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा,’ असा आदेश त्यांनी दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर तानाजी सावंत प्रचंड ट्रोल होत आहेत. याबाबत तानाजी सावंत यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारताच सावंत माध्यमांवरच भडकले. सावंत म्हणाले, मी तसे बोललेच नाही. तुम्हीच माझ्या वाक्याचा विपर्यास केला. यावेळी टीव्ही पत्रकारांच्या बुमकडे निर्देश करत, तुम्ही असे करत असाल तर तर तुमचे दांडके हे तुम्हालाच लखलाभ, अशा शब्दांत सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

आता राजीनामा देतो

तानाजी सावंत म्हणाले, हाफकीनबाबत मी तसे वाक्य बोललो असेल तर तुम्ही ते दाखवा. तसे असेल तर मी आता राजीनामा देतो. हाफकीन माणूस आहे की संस्था हे मला कळत नाही का? मी वेडा आहे का? माझे पूर्ण ऐकून न घेताच माझ्याविषयी काहीही छापले जाते, टीव्हीवर दाखवले जाते. आपण कुणाविषयी बोलतोय, याचे भान तरी माध्यमांनी बाळगायला हवे.

तुमच्या तोंडाला हात लावायचा का?

तानाजी सावंत म्हणाले, मी जे बोललोच नाही ते तुम्ही (माध्यमे) दाखवता. त्यामुळे तुमच्या तोंडावर हात लावायचा की दांडक्याला? मी जे बोललो ते तुम्ही दाखवतच नसाल तर मीडियाने परत माझ्यासमोर येऊ नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. मी जे बोलतो त्याचा विपर्यास करून जनतेसमोर ते मांडले जाते. जनतेला मी काय आहे, हे माहिती आहे. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी माझ्याशी संवाद साधू नये.

आम्ही सत्तेत आलो, हे पचनी पडले नाही

आम्ही सत्तेत आलो, हे अनेकांना अजूनही पचनी पडलेले नाही. त्यामुळेच आमची बदनामी केली जात आहे, असा आरोपही तानाजी सावंत यांनी केला. सावंत म्हणाले, केवळ एकनाथ शिंदे किंवा 50 आमदारांना वाटले म्हणून आम्ही बंड केले नाही. हा जनतेचा आक्रोश होता. आता आम्ही सत्तेत आलो आहोत, हेच अनेकांना पचनी पडलेले नाही. मात्र, त्याने काहीही होत नाही. जनतेला आमचा निर्णय पटला नाही तर जनता आम्हाला घरी बसवेल. जनता आम्हाला आमची जागा दाखवेल. माध्यमे माझ्याविषयी काय चालवतात याने फरक पडत नाही.

खेकड्यान धरण फोडले

आपल्या वक्तव्यांमुळे तानाजी सावंत यापूर्वीही वादात सापडले आहेत. यापैकीच त्यांचे एक वाक्य म्हणजे 'खेकड्याने धरण फोडले'. या वाक्यावरही तानाजी सावंत यांनी नंतर स्पष्टीकरण दिले होते की, केवळ खेकडेच नव्हे तर आजुबाजूची झाडे, बांधकाम कमकुवत झाल्यास धरण फुटू शकते, असे आपल्याला म्हणायचे होते.

घर ते ऑफिस दौरा
पावसाळी अधिवेशन संपवून आरोग्यमंत्री तानाची सावंत नुकतेच पुणे दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानुसार तानाजी सावंत यांचा 3 दिवसांचा दौरा ‘घर ते ऑफिस’ आणि ‘ऑफिस ते घर’ असा दीड किलोमीटरचा होता. या सरकारी दौऱ्यामुळेही तानाजी सावंत ट्रोल झाले होते.

From around the web