फडणवीस - शिंदे मंत्रिमंडळात धाराशिवच्या दोघांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार 

 
sd

धाराशिव ( उस्मानाबाद ) - सन २०१९ ची  विधानसभा  निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन  लढवली होती. त्यात धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक असे चार आमदार निवडून आले, पण सत्तेचे सूत्र बदलले आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये धाराशिव  जिल्ह्यातील एकाही शिवसेना आमदारांची वर्णी लागली नव्हती. 

महाविकास आघाडी सरकार गडगडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील लोकांच्या आशा पुन्हा पल्ल्वतीत झाल्या आहेत. फडणवीस - शिंदे मंत्रिमंडळात भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील तर शिंदे गटाकडून भूम - परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर  शिंदे गटाचे उमरगा - लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना एक तर राज्यमंत्री किंवा एखादे महामंडळ मिळू शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. 

 तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना राज्यमंत्री म्हणून अनुभव आहे. ते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. २००४ - २००९ : कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, तर २००८ ते नोव्हेंबर २००९ : महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून त्यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. पण भाजप - शिवसेना युतीला बहुमत मिळूनही महाविकास आघाडी स्थापन झाल्याने त्यांच्या पदरात निराशा पडली. आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


शिंदे गटाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत फडणवीस मंत्रिमंडळात शेवटच्या काळात सहा महिने कॅबिनेट मंत्री होते, पण महविकास आघाडीमध्ये त्यांना डावलण्यात आले, त्यामुळे ते नाराज होते. शरद पवार यांच्यामुळे त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे शिंदे गटात ते सहभागी झाले आहेत. आता त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चित स्थान मिळेल,अशी अपेक्षा आहे. 


 

From around the web