बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे 49 ग्रामपंचायतीत सरपंच

जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची माहिती

 
z

उस्मानाबाद - जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारत 49 ग्रामपंचायतीत सरपंच निवडून आलेले आहेत. तर भाजपासोबत महायुतीचे 30 सरपंच निवडून आले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने मोठा कौल दिला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापुढील काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पार्टी बरोबरीने जिल्ह्यात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या यशाबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  साळुंके यांनी सांगितले की,  परंडा तालुक्यातील येणेगाव-सावदरवाडी, भूम तालुक्यातील वांगी (खुर्द), वारेवडगाव-कासारी, वाशी तालुक्यातील मसोबाचीवाडी, पिंपळवाडी, वडजी रत्नापुर  अशा एकूण 8 पैकी 7 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत.


उस्मानाबाद तालुक्यातील 45 पैकी 13 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शेकापूर, शिंगोली, वरुडा, वाखरवाडी येथे स्वतंत्र सरपंच निवडून आले आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा महायुतीचे तडवळे, आंबेहोळ, रुईभर, कानेगाव, गोपाळवाडी, कोंबडवाडी, तेर, खानापूर, येडशी या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना व भाजप महायुतीचे सरपंच विजयी झाले आहेत.

कळंब तालुक्यात  30 पैकी 8 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच विजयी झाले आहेत. यामध्ये खामसवाडी, निपाणी, आवाडशिरपुरा, लोहटा पूर्व, रत्नापुर, हासेगाव (केज), हासेगाव (शिराढोण), शिराढोण या गावांचा समावेश आहे.


उमरगा 23 पैकी 9 गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच निवडून आलेले आहेत. यामध्ये महालिंगरायवाडी, नारंगवाडी, चिंचोली (ज), मळगी,  मळगीवाडी, बेळम्ब, कंटेकूर,  कोथळी  तर त्रिकोळी व सुंदरवाडी येथे युतीचे सरपंच निवडून आले आहेत. माडज, वरणाळवाडी, एकुरगा, चिंचोली (भुयार) येथे सर्वपक्षीय पॅनलचे सरपंच विजयी झाले आहेत.
 

लोहारा तालुक्यातील 13 पैकी 4 गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच विजयी झाले आहेत. यामध्ये उत्तर जेवळी, हिप्परगा रवा, माळेगाव, विलासपूर पांढरी तर नागुर येथे युतीचा सरपंच विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. माकणी व अचलेर येथे सर्वपक्षीय पॅनलचे सरपंच विजयी झाले आहेत.

तुळजापूर तालुक्यातील 48 पैकी 21 ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरपंच विजयी झाले आहेत असेही त्यांनी सांगितले.


नूतन सरपंचांचा सत्कार
पत्रकार परिषदेनंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, उप-जिल्हाप्रमुख आनंद वाघमारे महिला जिल्हाप्रमुख भरती गायकवाड,तालुकाप्रमुख अजित लाकाळ, शहरप्रमुख सनी पवार युवासेना कळंब तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे युवासेना शहरप्रमुख सागर कदम व शिवसैनिक उपस्थित होते.

From around the web