अर्चना पाटील - सक्षणा सलगर समर्थक आपसात भिडले 

सोशल मीडियावर दिवसभर घमासान
 
s

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी वादळी वातावरणात पार पडली. यावेळी आरोप - प्रत्यारोपाची धुळवड पहावयास मिळाली.  भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष आणि झेडपी सदस्या सक्षणा सलगर यांनी घणाघाती आरोप केला होता. त्यानंतर आज  अर्चना पाटील - सक्षणा सलगर समर्थक आपसात भिडले  असून सोशल मीडियावर दिवसभर घमासान सुरु आहे. 

अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाला निधी न देता, स्वतःच्या कॅबीनवर लाखो रुपयाचा खर्च केला तसेच शासकीय गाडीचा वापर चहाच्या कॅटल्या ठेवण्यासाठी केला, असा आरोप सक्षणा सलगर  यांनी माध्यमाशी बोलताना केला होता. या आरोपानंतर अर्चना पाटील यांचे समर्थक सक्षणा सलगर यांना सोशल मीडियावर ट्रोल करीत आहेत. विविध पोस्ट लिहून आपली भडास बाहेर काढत आहेत. त्यांच्या या पोस्टला  सक्षणा सलगर  समर्थक उत्तर देत असून,आज दिवसभर केवळ आणि केवळ अर्चना पाटील - सक्षणा सलगर  ट्रेंड सुरु आहे. 

सक्षणा सलगर या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता. पण राणा पाटील यांचा पराभव  झाला होता.  नंतर राणा पाटील यांनी  विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला तर  सक्षणा सलगर या राष्ट्रवादीमध्ये कायम राहिल्या , त्यांच्याकडे युवतीची प्रदेश अध्यक्ष म्हणून जबादारी सोपवण्यात आली . राणा पाटील भाजपमध्ये गेल्याने  सक्षणा सलगर यांना बळ देण्याचे काम खा. सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनी केले  आहे. काही दिवसापूर्वी खुद्द शरद पवार आणि तीन मंत्री सक्षणा सलगर यांच्या मतदारसंघात येऊन कामाचे कौतुक केले होते. त्याची सल अर्चना पाटील - राणा पाटील यांच्या समर्थकांना आहे, त्यात काल सक्षणा सलगर  यांनी अर्चना पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्याने अर्चना पाटील - सक्षणा सलगर समर्थक सोशल मीडियावर आपसात भिडले आहेत. 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून  सक्षणा सलगर उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. असे झाले तर अर्चना पाटील - सक्षणा सलगर  ही  लढत हायहोल्टेज ठरणार आहे. 

From around the web