यशवंत भंडारे : लातूर माहिती उपसंचालक पदावरून पायउतार
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी यशवंत भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल ६ वर्षे उपसंचालक म्हणून काम करणाऱ्या भंडारे यांची मूळ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त माहिती विभागातील पदोन्नतीचा घोळ समोर आला आहे.
यशवंत भंडारे यांचे मूळ पद जिल्हा माहिती अधिकारी होते.सन २०१४ मध्ये ११ महिन्याकरिता त्यांना तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्यात आलीं होती. त्यांच्याकडे लातूर विभागाचे माहिती उपसंचालक पदाचा पदभार होता तसेच अनेक वेळा औरंगाबाद माहिती उपसंचालक म्हणूनही अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. केवळ ११ महिन्यासाठी देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती तब्बल सहा वर्षे सुरु होती. सहा वर्षानंतर शासनाचे डोळे उघडले असून, भंडारे यांना मूळ पदावर आणण्यात आले असून त्यांची रिक्त उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
उस्मानाबादचे वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची अलिबागला बदली झाल्यानंतर गेल्या अनेक महिन्यापासून उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी पद रिक्त होते. या पदावर भंडारे यांना बसवण्यात आले आहे. सानप आणि भंडारे यांची चांगली मैत्री असून, भंडारे यांच्याकडे उपसंचालक पदाचा पदभार असताना सानप यांच्या अनेक गैरकारभारावर पांघरून घातले होते.भंडारे यांना गुळाचा गणपती करण्यात आल्याने लातूर माहिती विभागात सावळा गोंधळ माजला होता.
गंमत म्हणजे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्याकडे लातूर उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पूर्वी सोनटक्केचे बॉस भंडारे होते आणि आता भंडारेचे बॉस सोनटक्के झाले आहेत.