तुळजापूर रिंगरोड बनला मृत्यूचा सापळा !

तुळजापूर : तुळजापूर रिंगरोड मृत्यूचा सापळा बनला असून, येथे दररोज अपघात होत असल्याने या रिंगरोडवरून जाणारे धसतवाले आहेत. या ठिकाणी ओव्हर ब्रीज बांधण्याची मागणी खासदार ओमराजे यांनी केली आहे.
तुळजापूर येथील रिंगरोडवर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे समजताच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेड यांना तुळजापूर येथील रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यासाठी सूचना केल्या आहेत.
तुळजापुरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहराबाहेर रिंगरोड बनवला असून, सदर रिंगरोड दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडतो. तुळजापूरपासून ३ किमीवर रिंगरोडवर काल तीन वाहनांचा अपघात घडून जीवित व वित्तहानी झाली. नागरिकांकडून येथे होत असलेल्या अपघातांबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
खासदार ओमराजे यांनी त्वरित त्या प्रश्नात लक्ष घालुन संबंधीत अधिकारी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नांदेड) यांना यासंबंधी तत्काळ लक्ष घालून त्याठिकाणी ओव्हरब्रीजची बांधणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक, रेडीयम साइनबोर्ड व आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. ओव्हरब्रीजचे बांधकाम झाल्यास अपघात टाळता येऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.