तुळजापूर तालुक्यात वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान
Tue, 8 Sep 2020
पंचनामे करण्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे आवाहन
तुळजापूर - मागील २-३ दिवसापासून होत असलेल्या वादळी पावसामुळे तसेच ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचीत केले होते, त्या अनुषंगाने तहसीलदार तुळजापूर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणांहून उसाचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच मागील महिन्याच्या पावसातील खंडामुळे काही ठिकाणचे सोयाबीन सुकले आहे. याबाबत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यासह तहसीलदार तुळजापूर यांच्याशी आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी चर्चा करत शेतकऱ्यांच्या अर्जानुसार झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने वादळी पावसामुळे अथवा अल्प पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तलाठी यांच्याकडे अर्ज करून पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी केले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
कालच नांदुरी ता.तुळजापूर येथील नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कलसुरे, कृषी सहाय्यक धनके मॅडम, कृषी मित्र अरविंद मुळूक सयाजी गोंगाणे यांना नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी बाबूराव गोंगाणे, रमेश शिवाजी गोंगाणे, शिवाजी मुरलीधर गोंगाणे
व नेताजी गोपीनाथ गोंगाणे आदी शेतकरी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे १५ सप्टेंबर ला महसूल विभागाकडून खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली जाते. पैसेवारी काढण्याची प्रक्रिया सुरू असून प्रशासनाला याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील महसूल प्रशासनाचे अधिकारी/कर्मचारी शेतात आल्यानंतर प्रक्रियेवर लक्ष ठेवून सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.