तुळजापूरच्या अभिषेक मानेविरुद्धचा स्थानबद्धतेचा आदेश राज्याच्या गृह विभागाकडून रद्द
Sep 16, 2020, 15:29 IST
तुळजापूर - तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांचा मुलगा अभिषेक माने याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत काढण्यात आलेला स्थानबद्धतेचा आदेश राज्याच्या गृह विभागाने रद्द केला आहे.
अभिषेक माने विरुद्ध तुळजापूर पोलिसांनी खोटा रिपोर्ट तयार करून एमपीडीए अधिनियम १९८१ अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता, एसपींनी त्याची पडताळणी न करता हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता, त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी २९ जुलै २०२० रोजी अभिषेक माने यास स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला होता, त्यानंतर पोलिसानी माने यास अटक करून औरंगाबादच्या मध्यवर्ती (हर्सूल) कारागृहात स्थानबद्ध केले होते.
त्यानंतर या स्थानबद्ध प्रस्तावाची राज्याच्या गुह विभागासमोर सुनावणी होवून , उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला स्थानबद्धतेचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तुळजापुरातील काही राजकीय मंडळींना हाताशी धरून पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई केली होती, असा आरोप राजाभाऊ माने यांनी केला आहे.अभिषेक माने विरुद्ध चार खोटे गुन्हे दाखवण्यात आले होते, तसेच जे गुन्हे दाखल आहेत, ते गंभीर स्वरूपाचे नाहीत, तसेच गुंडा रजिस्टर बोगस तयार करण्यात आले होते, ही बाब राज्याच्या गुह विभागाला लक्षात आल्यामुळे स्थानबद्धतेचा आदेश राज्याच्या गृह विभागाने रद्द केला आहे, असे त्यांनी सांगितले.