उमरगा बस्थानकावरील "त्या" चिमुकल्यांच्या माता - पित्याचा लागला अखेर शोध ... 

कोरोना महामारीच्या संकटामुळे उपासमार होत असल्याने मातेने उचलले टोकाचे पाऊल !
 
s

उमरगा - उमरगा बसस्थानकावर शनिवारी दुपारी एक दोन महिन्याची आणि एक तीन वर्षाची मुलगी सोडून माता फरार झाली होती. सोशल मीडियावर आणि उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर या चिमुकल्यांचे फोटो व्हायरल होताच, अखेर त्यांच्या माता - पित्यांचा शोध लागला आहे. 

घडले असे की , उमरगा बसस्थानकावर प्लँटफॉर्म क्रमांक पाचवर एका तीन वर्षाच्या मुलीच्या मांडीवर दोन महिन्याचे बाळ रडत होते आणि मोठी बहीण आई - आई म्हणून रडत होती. त्यांचे रडणे पाहून दोन तृतीयपंथी आले आणि त्यांचा सांभाळ सुरु केला. तीन ते सहा वाजेपर्यंत त्यांची माता जवळ आली नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांनी स्पीकरवर पुकारुनही माता न आल्याने उमरगा पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. उमरगा पोलिसांनी या चिमुकल्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले, तेथे दोन ते तीन महिला पोलिसांनी या चिमुकल्यांचा सांभाळ केला. 

sd

माता - पित्याचा लागला अखेर शोध ... 

दरम्यान, या चिमुकल्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाले. उस्मानाबाद लाइव्हनेही  आपल्या फेसबुक पेजवर त्यांचे फोटो पोस्ट केले. त्यानंतर या चिमुकल्यांच्या माता - पित्याचा शोध लागला. 

ही लहान दोन्ही मुली अणदूर - सराटी रस्त्यावरील पाटील तांडा येथील दिनेश मेघा राठोड यांची निघाली. त्यांची बायको सुनीता राठोड ही तुगाव ( उमरगा ) तांडा येथील रहिवासी असून, माहेरला जाते म्हणून तिने आपली दोन चिमुकली बालके जाणीवपूर्वक उमरगा बसस्थानकावर सोडून आपल्या घरी परतली होती. 

d

अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख यांनी, दिनेश मेघा राठोड यांच्याशी शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संपर्क करून एका कारने उमरगा पोलीस स्टेशनला पाठवले आणि रात्री उशिरा त्यांनी आपली लहान बालके ताब्यात घेतली. 

d

कोरोना महामारीचे संकट आणि त्यात दोन मुली ... 

कोरोना महामारीच्या संकटामुळे कामधंदा नसल्याने दिनेश राठोड आणि त्यांची बायको सुनीता यांची उपासमार होत होती. त्यात दोन्ही मुली झाल्याने त्यांच्यात कुरबुरी होत होत्या. त्याच्या त्रासाला कंटाळून मातेने हे टोकाचे पाऊल उचलले होते, अशी माहिती समोर आली आहे. 

दत्तक घेण्यास अनेकजण सरसावले... 

उस्मानाबाद लाइव्हच्या फेसबुक पेजवर या चिमुकल्यांचे फोटो व्हायरल होताच, अनेकांनी उस्मानाबाद लाइव्हशी संपर्क करून या चिमुकल्यांना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या चिमुकल्यांच्या माता - पित्यांचा शोध लागल्याने आणि कारण समोर आल्याने त्यांना मदतीचा कुणी हात देईल का ? हा सवाल आहे. 


 

From around the web